ग्रामसभेतच फेकल्या चपला, जोडे; आजंती गावातील घटना
By विलास गावंडे | Updated: January 30, 2024 21:34 IST2024-01-30T21:34:17+5:302024-01-30T21:34:24+5:30
पारधी बांधव संतापले, गावकऱ्यांवर केली दगडफे, तीन जण जखमी

ग्रामसभेतच फेकल्या चपला, जोडे; आजंती गावातील घटना
नेर (यवतमाळ) : पारधी बांधवांच्या वास्तव्याची जागा निश्चित करण्यासाठी आजंती येथे मंगळवारी झालेल्या ग्रामसभेत गोंधळ झाला. प्रशासनाने सांगितलेल्या जागेला त्यांनी विरोध केला तर, गावकऱ्यांनी समर्थन केले. यामुळे संतापलेल्या पारधी बांधवांनी गावकऱ्यांवर दगडफेक केली. या प्रकारात तीन जण जखमी झाले. रामेश्वर रामसिंग चव्हाण, विनोद चव्हाण आणि रमेश राठोड, अशी जखमींची नावे आहेत.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या आदेशानुसार आंजती येथे इनकॅमेरा ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १०:३० वाजता सेभला सुरूवात झाली. सरपंच भाग्यश्री अवघड यांनी गट क्रमांक १९ ही जागा पारधी बांधवाकरिता उपलब्ध करून देण्याविषयीचा ठराव मांडला. या ठरावाच्या बाजूने असलेल्यांनी हात वर करण्याची सूचना त्यांनी केली. त्यावेळी पारधी बांधवांनी याला विरोध केला.
आजंती येथील गावकऱ्यांनी या ठरावाचे समर्थन केले. पारधी बांधवांना सध्या वास्तव्याला असलेली जागाच पाहिजे असल्याने संतापले. सभा सोडून त्यांनी सभागृहाबाहेर ठेवून असलेल्या चपला, जोड्यांचा मारा ग्रामसभेला उपस्थितांवर केला. नंतर रस्त्यावर चक्काजाम करून गावकऱ्यांवर दगडफेक केली. यामध्ये रामेश्वर रामसिंग चव्हाण, विनोद चव्हाण आणि रमेश राठोड हे गंभीर जखमी झाले. काहींना किरकोळ दुखापत झाली.
इनकॅमेरा ग्रामसभेला तहसीलदार डॉ. शिवाजी मगर, गटविकास अधिकारी राजीव शिंदे, सहायक गटविकास अधिकारी आशिष राऊत, जी व्ही. धर्माळे, ग्रामसेविका शितल फुणसे, नायब तहसीलदार संजय भोयर आदी उपस्थित होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी चिलुमुल्ला रजनीकांत, पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब नाईक आदींनी प्रयत्न केले. दरम्यान, यवतमाळ येथून दंगल नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले होते.