तीन वर्षानंतर मिळाले क्रीडा स्पर्धांचे १३ लाख
By Admin | Updated: February 26, 2016 02:12 IST2016-02-26T02:12:25+5:302016-02-26T02:12:25+5:30
तीन वर्षापूर्वी झालेल्या पायकाअंतर्गत स्पर्धेतील बक्षीसाची रक्कम प्राप्त झाली. मात्र एकाही तालुका संयोजकाने स्पर्धेचा हिशेब सादर केला नाही.

तीन वर्षानंतर मिळाले क्रीडा स्पर्धांचे १३ लाख
पायका क्रीडा स्पर्धा : तालुका संयोजकाकडून हिशेबच सादर नाही, निधी परत जाण्याची चिन्हे, देयकांची जुळवाजुळव
नीलेश भगत यवतमाळ
तीन वर्षापूर्वी झालेल्या पायकाअंतर्गत स्पर्धेतील बक्षीसाची रक्कम प्राप्त झाली. मात्र एकाही तालुका संयोजकाने स्पर्धेचा हिशेब सादर केला नाही. त्यामुळे १३ लाख रुपयांचा निधी परत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पंचायत युवा खेळ व क्रीडा अभियान (पायका) अभियान अंतर्गत तालुका ते राष्ट्रीय स्तरपर्यंत दरवर्षी ग्रामीण क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. १६ वर्षाआतील मुले-मुली या स्पर्धेत सहभागी होत असतात. यवतमाळ जिल्ह्यात २०१२-१३ या वर्षी जिल्हा क्रीडा संकुल नेहरु स्टेडियम येथे तालुकास्तरीय पायका स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत सोळाही तालुक्यातील पाच हजार खेळाडूंनी सहभाग नोंदविला. स्पर्धा आयोजनासाठी शासनाकडून निधी मिळाला नसल्याने तत्कालीन जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी इतर स्पर्धेच्या निधीतून तालुका संयोजकांना निधी दिला. पायका स्पर्धेत प्रथम तीन क्रमांक प्राप्त वैयक्तिक खेळाडू व संघातील सदस्यांना रोख रक्कम बक्षीस देण्यात येते. मात्र निधी अभावी विजयी खेळाडूंचे बक्षीस उधार ठेवण्यात आले.
२०१२-१३ मध्ये या स्पर्धेत खेळणारे खेळाडू नववी-दहावीत होते. यातील अनेक खेळाडू आज पदवीस्तर प्रथम वर्गाचे शिक्षण घेत आहेत. जानेवारी २०१० मध्ये जिल्हा क्रीडा कार्यालयाला तब्बल तीन वर्षानंतर या स्पर्धेचा १२ लाख ८० हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.
गंमत म्हणजे क्रीडा स्पर्धा संपल्यानंतर क्रीडा स्पर्धांचे अहवाल तालुका संयोजकाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात ताबडतोब सादर करावा असे बंधन आहे. स्पर्धा आयोजन करून तीन वर्ष उलटले तरी सोळा पैकी एकाही तालुका संयोजकाने स्पर्धेचा हिशेबच सादर केलेला नाही.
आता क्रीडा स्पर्धेचे चित्रीकरण
पायका क्रीडा स्पर्धेच्या प्रत्येक स्तरावरील क्रीडा स्पर्धेचे चित्रिकरण करणे अनिवार्य आहे. शिवाय व्हीडीओ शूटिंग, फोटोग्राफी व वृत्तपत्र कात्रणे याची सीडी तयार करून क्रीडा स्पर्धा अहवाल सोबत सादर करणे बंधनकारक असल्याने तीन वर्षापूर्वी झालेल्या क्रीडा स्पर्धेची व्हीडीओ शूटिंग वा फोटोग्राफी तालुका संयोजक कशी करणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.