उमरखेडच्या तिघांची एमपीएससी परीक्षेत भरारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 05:00 IST2020-06-21T05:00:00+5:302020-06-21T05:00:36+5:30
१९ जून रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल लागला. त्यामध्ये मरसूळ येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका बेबीताई गायकवाड यांची कन्या स्नेहल दीपक राहटे यांची उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाली आहे. यापूर्वीही २०१७ मध्ये स्नेहल राहटे यांची नगरपरिषद मुख्याधिकारी म्हणून निवड झाली होती. सध्या त्या बार्शिटाकळी (जि. अकोला) नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

उमरखेडच्या तिघांची एमपीएससी परीक्षेत भरारी
अविनाश खंदारे।
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : एमपीएससीच्या ताज्या निकालात तालुक्यातील तिघांनी भरारी घेतली. उमरखेड शहरातील स्नेहल दीपक राहटे व बिटरगाव येथील गौरव साहेबराव इंगोले यांची उपजिल्हाधिकारी म्हणून तर नागापूर येथील निरंजन तुकाराम कदम यांची तहसीलदार पदी निवड झाली. या तिघांनी प्रतिकूल परिस्थितीत मिळविलेल्या यशाने उमरखेडचा सन्मान वाढला आहे.
१९ जून रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल लागला. त्यामध्ये मरसूळ येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका बेबीताई गायकवाड यांची कन्या स्नेहल दीपक राहटे यांची उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाली आहे. यापूर्वीही २०१७ मध्ये स्नेहल राहटे यांची नगरपरिषद मुख्याधिकारी म्हणून निवड झाली होती. सध्या त्या बार्शिटाकळी (जि. अकोला) नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तालुक्यातील पैनगंगा अभयारण्यात येणाऱ्या बिटरगावातील मूळ रहिवासी व नांदेडच्या पिपल्स कॉलेजचे निवृत्त उपप्राचार्य साहेबराव इंगोले यांचा मुलगा गौरव साहेबराव इंगोले यांचीही उपजिल्हधिकारी म्हणून निवड झाली आहे. गौरव इंगोले सध्या कौशल्य विकास सहायक आयुक्त, नवी मुंबई येथे कार्यरत आहेत. उमरखेड तालुक्यातील आदर्श ग्रामपंचायत म्हणून नावलौकिक मिळवलेल्या नागापूर येथील जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम व माजी पंचायत समिती सभापती सविता कदम यांचा पुतण्या निरंजन तुकाराम कदम यांचीही तहसीलदार म्हणून निवड झाली आहे. तालुक्यातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यशस्वी होत आहे. या तिघांच्या घवघवीत यशामुळे उमरखेड तालुक्याची मान अभिमानाने उंचावली आहे.
मी आईचे स्वप्न पूर्ण केले
मी उपजिल्हाधिकारी व्हावे हे माझ्या आईचे स्वप्न होते. आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी २०१५ पासून परिश्रम घेत आहे. त्याला आज यश मिळाले. या यशाचे श्रेय माझ्या आईलाच आहे.
- स्नेहल राहटे,
मुख्याधिकारी बार्शिटाकळी
शेतकऱ्याचा मुलगा अधिकारी झाला
माझे काका जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम व माजी सभापती सविताताई कदम उमरखेड तालुक्यात लोकसेवा करत आहे. माझे आईवडील शांताबाई व तुकाराम हे शेती करतात. शेतकऱ्याचा मुलगा अधिकारी झाला पाहिजे, हे त्यांचे स्वप्न पूर्ण करता आले, याच मला आनंद आहे.
- निरंजन कदम, नागापूर
विद्यार्थ्यांनी ध्येय ठरवावे
स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेताना परीक्षा का द्यायची आहे, हे विद्यार्थ्यांनी निश्चित केले पाहिजे. त्यात उत्तीर्ण झाल्यानंतर समाजाभिमुख कार्य करण्याची मनाची तयारी ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपले ध्येय निश्चित ठेवले तर यश मिळणारच.
- गौरव इंगोले, बिटरगाव