साडेतीन हजार विहिरी रखडल्या
By Admin | Updated: January 3, 2017 02:21 IST2017-01-03T02:21:28+5:302017-01-03T02:21:28+5:30
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या साडे तीन हजार विहिरींची कामे रखडली आहे. केवळ सहा हजार

साडेतीन हजार विहिरी रखडल्या
मग्रारोहयो : ५८ कोटींचा झाला खर्च
यवतमाळ : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या साडे तीन हजार विहिरींची कामे रखडली आहे. केवळ सहा हजार विहिरी आत्तापर्यंत पूर्णत्वास गेल्या आहेत.
शेतकऱ्यांना बारमाही ओलिताची सोय उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरी बांधून देण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. जिल्हा परिषदेने या योजनेअंतर्गत तब्बल १५ हजार ८५३ विहिरींना प्रशासकीय मान्यता प्रदान केली. मात्र विहिरी खोदण्याचे काम अत्यंत संथगतीने होत असल्याने आजमितीस केवळ सहा हजार ३१५ विहिरी पूर्ण झाल्या आहेत. ही गती कायम राहिल्यास उर्वरित विहिरी पूर्ण होण्यास किती काळ लागेल, हे सांगणे कठीण झाले आहे.
या योजनेंतर्गत सध्या जिल्ह्यात पाच हजार ८७५ विहिरींची कामे सुरू आहेत. पूर्ण झालेल्या आणि कामे सुरू असलेल्या विहिरींवर तब्बल ५८ कोटी ४७ लाख ३७ हजार रूपयांचा खर्च झाला आहे. अद्याप तीन हजार ६६३ विहिरींची कामे प्रतीक्षेतच आहे. या साडे तीन हजार विहिरींची कामे कधी सुरू होतील, त्या कधी पूर्ण होतील, हे सांगायला कुणीच तयार नाही. त्यामुळे किमान तीन हजार ६६३ शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न डोळ्यातच साठवून राहणार आहे. (शहर प्रतिनिधी)
६८ कोटींची गरज
४विदर्भ धडक सिंचन विहिरी योजनेतून दोन हजार ७५ विहिरी पूर्ण झाल्या आहेत. मात्र तीन हजार ७७० विहिरी अद्याप अपूर्ण आहे. यापैकी एक हजार ४११ विहिरींची कामे सुरू आहे. उर्वरित दोन हजार ७२१ विहिरींसाठी निधीच उपलब्ध नाही. त्यासाठी ६८ कोटींच्या निधीची गरज आहे. दरम्यान, यापूर्वीच या योजनेतील चार हजार १४ विहिरी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेत वर्ग करण्यात आल्या आहेत.