तीन हजार पोलीस तैनात
By Admin | Updated: February 16, 2017 00:17 IST2017-02-16T00:17:06+5:302017-02-16T00:17:06+5:30
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.

तीन हजार पोलीस तैनात
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक : एसआरपीएफ, होमगार्ड कार्यरत
यवतमाळ : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी तीन हजार पोलीस, एक हजारावर होमगार्ड आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या २४ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात १७१२ केंद्रावर पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी गुरूवारी मतदान घेतले जाणार आहे. यासाठी प्रशासनाने तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर एक पोलीस व एक होमगार्ड राहणार आहे. याशिवाय संवेदनशील असलेल्या जिल्ह्यातील ८४ केंद्रांवर जादा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दोन हजार ९३६ पोलीस कर्मचारी आणि एक हजार १३२ होमगार्ड बंदोबस्ताला लावण्यात आले आहे.
निवडणुकीसाठी १६२ सहायक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक तैनात आहे. यातील ६४ अधिकारी पोलीस ठाणे पेट्रोलिंगवर राहणार आहे. यातीलच ३१ अधिकारी राखीव ठेवण्यात आले आहे. २२ अधिकारी जिल्हा सीमेवर राहणार आहे. हे अधिकारी व कर्मचारी नाकाबंदीसाठी तैनात करण्यात आले, ते वाहनांची तपासणी करतील. १३ तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक तुकडी याप्रमाणे राज्य पोलीस दलाचे कर्मचारी तैनात केले गेले आहे. पुसद, दारव्हा व उमरखेड तालुक्यातील जातीय स्थिती लक्षात घेऊन या तिनही तालुक्यात राज्य राखीव पोलीस दलाची प्रत्येकी एक जादा प्लॉटून तैनात राहणार आहे.
जिल्ह्यातील ३१ पोलीस ठाण्यांमधील ८० टक्के पोलीस बंदोबस्तात आहे. त्यामुळे या पोलीस ठाण्यांची परिस्थिती हाताळण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. यात अ दर्जाचे पोलीस ठाणे व इतर पोलीस ठाणे, अशी वर्गवारी करण्यात आली आहे. त्यासाठी २०० अतिरिक्त होमगार्डची नियुक्ती आहे.
६८०० कर्मचारी
जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ५५ जागांसाठी होवू घातलेल्या मतदानासाठी एक हजार ७१२ केंद्र आहेत. या प्रत्येक केंद्रावर प्रत्येकी चार कर्मचाऱ्यांची मतदान अधिकारी, कर्मचारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. याशिवाय ६८४ कर्मचारी राखीव म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. एखाद्या मतदान केंद्रावर गोंधळ उडाल्यास राखीव कर्मचाऱ्यांना तेथे परिस्थिती हाताळण्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे सर्व कर्मचारी पोलिसांसह मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी कार्यरत आहेत. (शहर प्रतिनिधी)
विविध पथकांचे गठन
निवडणुकीसाठी निवडणूक विभागाने विविध पथकाचे गठन केले आहे. यात जिल्ह्यात ४१ फ्लार्इंग स्कॉड, ४८ स्टॅस्टेस्टिक सर्व्हलन्स टीम आणि ३६ व्हीडीओ पथक राहणार आहे. प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे हे पथक नियुक्त करण्यात आले आहे. यात सर्वाधिक पथके दारव्हा तालुक्यात राहणार आहे. गुरूवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदानाची प्रक्रिया चालणार आहे. संवेदनशील मतदान केंद्रावर प्रशासनासह पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे.