तिघे निलंबित, आणखी १५ जणांचा प्रस्ताव
By Admin | Updated: January 31, 2016 02:35 IST2016-01-31T02:35:07+5:302016-01-31T02:35:07+5:30
जिल्हा परिषद आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे.

तिघे निलंबित, आणखी १५ जणांचा प्रस्ताव
आरोग्य विभाग : निलंबनाला विरोध, दोन आठवड्यांचा ‘अल्टीमेटम’
यवतमाळ : जिल्हा परिषद आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. आतापर्यंत तिघांना निलंबित करण्यात आले असून १२ जणांचा प्रस्ताव तयार आहे. या विरोधात राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेने आंदोलन पुकारले असून प्रशासनाला १५ दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे.
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर वैद्यकीय अधिकाऱ्यांवर सूडभावनेतून कारवाई होत आहे. मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असताना या अधिकारी-कर्मचाऱ्यांना जबाबदार धरण्यात येते. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी आरोग्य केंद्रांच्या भेटीचा सपाटा लावला. तेथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत आक्षेप घेवून कारवाई करण्याचे प्रस्ताव जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याकडे पाठविले. याच आधारावर तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले, तर १२ जणांचा प्रस्ताव आहे. मुळात वाढत्या लोकसंख्येनुसार वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदनिर्मितीच करण्यात आलेली नाही. डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे कामाचे तास निश्चित नाही. अशा स्थितीत कारवाईचा सपाटा अन्यायकारक असल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष धर्मेश चव्हाण यांनी सांगितले. या आंदोलनाला नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटनेनेसुद्धा पाठिंबा दिला. शासनाने लोकसंख्येच्या आधारावर पदनिर्मिती करावी त्यानंतरच कर्मचाऱ्यांकडून कामाची अपेक्षा करावी, अशी मागणी अशोक जयसिंगपुरे यांनी केली. मॅग्मो संघटनेने डीएचओ बैठकीवर बहिष्कार टाकला. आता प्रशासनाला १५ दिवसांचा अवधी दिला आहे. (कार्यालय प्रतिनिधी)