शिवाजीनगर दरोड्यातील तिघांना यवतमाळात अटक

By Admin | Updated: July 12, 2016 02:48 IST2016-07-12T02:48:43+5:302016-07-12T02:48:43+5:30

येथील शिवाजी नगरातील व्यावसायिक पंकज नानवानी यांच्या घरी दिवसाढवळ्या रिव्हॉल्वरच्या धाकावर दरोडा

Three of the Shivajinagar Dock arrested in Yavatmal | शिवाजीनगर दरोड्यातील तिघांना यवतमाळात अटक

शिवाजीनगर दरोड्यातील तिघांना यवतमाळात अटक

आरोपी अमरावतीचे : चोरीसाठी चाळीस दिवसांपासून यवतमाळात मुक्काम
यवतमाळ : येथील शिवाजी नगरातील व्यावसायिक पंकज नानवानी यांच्या घरी दिवसाढवळ्या रिव्हॉल्वरच्या धाकावर दरोडा टाकणाऱ्या तिघांना पोलिसांनी पाळत ठेवून अटक केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश सिंह यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली.
अटकेतील आरोपींची नावे सुरज अनिल मौर्य (१९) रा. सक्करसाथ अमरावती, शुभम मनोज गुल्हाने (१९) रा. पवनपुरा अमरावती व अमन रामप्रसाद कैथवास (२०) रा. वडगाव, यवतमाळ अशी आहेत. स्थानिक शिवाजीनगरात केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष तथा टॉप फार्मा या होलसेल औषध फर्मचे संचालक पंकज नानवाणी यांच्या घरात प्रवेश करून त्यांच्या वृद्ध आई व पत्नीला शस्त्राचा धाक दाखवून २३ जून रोजी दिवसाढवळ्या या तिघांनी दरोडा टाकला होता. या घटनेत ऐवज जरी कमी असला तरी दिवसाढवळ्या घरात शिरून महिलांना शस्त्र दाखवून घडलेल्या या गंभीर घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती.
दरोड्याच्या गुन्ह्यात अटकेत असलेले सूरज व शुभम हे दोघे अमनच्या लिंकमधून यवतमाळ येथे चोऱ्या करीत होते. एक मोठा हात मारून ते येथून जाणार होते. उल्लेखनिय म्हणजे चोरी करण्यासाठी ते वडगाव परिसरात मागील दीड महिन्यांपासून भाड्याने खोेली घेऊन राहत होते. त्यांच्या खोलीची झडती घेऊन पोलिसांनी एक देशी कट्टा, ७.६५ एमएमचे तीन जीवंत राऊंड, लोखंडी रॉड, चाकू, दोन डीव्हीडी प्लेअर, चांदीचे दागिने, मोबाईल आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे.
सीसीटीव्ही फुटेज व स्केचच्या मदतीने तसेच गोपनिय पथकाच्या सहाय्याने आरोपींना राणाप्रताप गेट परिसरातून अटक करण्यात आली. या चोरट्यांकडून यवतमाळ व अमरावती परिसरात केलेल्या इतर चोऱ्याही उघडकीस येण्याची शक्यता जिल्हा पोलीस अधीक्षकांनी व्यक्त केली आहे.
ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह व अपर पोलीस अधीक्षक काकासाहेब डोळे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, पोलीस निरीक्षक देविदास ढोले, एपीआय प्रशांत गीते व संतोष केंद्रे, दिलीप गिरी व बबलू चव्हाण, इमाम पठाण, आशिष चौबे, गजानन धात्रक, बंडू मेश्राम आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी पार पाडल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Three of the Shivajinagar Dock arrested in Yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.