नागपुरात मालाची विक्री : बाभूळगाव येथील अडत व्यापाऱ्याचे प्रकरणयवतमाळ : बनावट नंबरप्लेट आणि ट्रकचे खोटे दस्तावेज तयार करून पाच लाख रुपये किमतीची १६ टन सोयाबीन लंपास करण्यात आली होती. ही घटना बाभूळगाव येथील एका अडत व्यापाऱ्याकडे १५ दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेचा कट ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील तीन सदस्यीय टोळीने रचल्याचे उघडकीस आले असून, त्यांनी पळविलेल्या सोयाबीनसह तिघांनाही अटक करण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने केली. सरबजीतसिंग सुरेंद्रसिंग सिद्धु (३८) रा. नागपूर असे अटकेतील मुख्य सूत्रधाराचे तर मोहंमद ईसरार मोहंमद इस्तीयाक शेख (२५) रा. तळेगाव, अकील हैदर मुख्तार अली (४०) रा. नागपूर अशी त्याच्या या कटात सामिल असलेल्या साथिदारांची नावे आहेत. अनिल जवाहरीलाल खिवसरा रा. यवतमाळ यांची बाभूळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत अडतचा व्यवसाय आहे. त्यांनी घुग्गुस येथील एका सोया प्लांटसाठी पाच लाख रुपये किमतीची १६० क्विंटल सोयाबीन खरेदी केली होती. ती घुग्गुस येथे पोहोचविण्यासाठी त्यांनी साईबाबा ट्रान्सपोर्टचे किशोर पटवारी यांच्याशी बोलणी केली. पटवारी यांनी चालक मोहंमद ईसरार याला ती जबाबदारी सोपविली. त्याने ट्रक (क्र. एनएल ०२ के ५९६०)चा मालक सरबजीतसिंग याच्याशी संगणमत करून या ट्रकचे बनावट दस्तावेज तयार केले. तसेच बनावट क्रमांक ट्रकवर टाकून १२ डिसेंबरला सोयाबीनचा माल ट्रकमध्ये भरला तसेच ट्रक घुग्गुससाठी निघाला. मात्र बरेच दिवस उलटूनही ट्रक पोहोचलाच नाही तेव्हा खिवसरा यांना शंका आली. त्यांनी चौकशी केली तेव्हा सोयाबीन पळविल्याचे लक्षात आले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे फौजदार सुगत पुंडगे यांच्याकडे सोपविण्यात आला. त्यांनी कॉल डिटेल्सवर लक्ष केंद्रीत करून मोहंमद ईसरार व सरबजीतसिंग या दोघांना भोपाळ येथून अटक केली. त्यांनी सोयाबीन पळविल्याची कबुली दिली. तसेच चोरीतील माल नागपूर येथील अकील हैदर याला विकल्याचे उघड केले. त्यावरून पोलिसांनी तिघांनाही अटक केली. ट्रकसह चोरीतील सोयाबीनही जप्त केली. या कारवाईत आशीष चौबे, सचिन हुमणे, साजीद खान, अतुल इंगळे, मंगेश आजने यांनी सहभाग घेतला. (स्थानिक प्रतिनिधी)
कट रचून १६ टन सोयाबीन लंपास करणारे तिघे गजाआड
By admin | Updated: December 23, 2014 23:12 IST