वाघाच्या हल्ल्यात माजी सरपंचासह तीन गंभीर

By Admin | Updated: June 10, 2017 01:02 IST2017-06-10T01:02:08+5:302017-06-10T01:02:08+5:30

गावालगतच्या नाल्यावर प्रात:र्विधीसाठी गेलेल्या दोन मजुरांवर पट्टेदार वाघाने हल्ला केला.

Three senior critics, including former sarpanch, attacked the Tiger | वाघाच्या हल्ल्यात माजी सरपंचासह तीन गंभीर

वाघाच्या हल्ल्यात माजी सरपंचासह तीन गंभीर

मांगली, हिरापुरातील घटना : लागोपाठ हल्ले, गावकरी दहशतीत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुकुटबन : गावालगतच्या नाल्यावर प्रात:र्विधीसाठी गेलेल्या दोन मजुरांवर पट्टेदार वाघाने हल्ला केला. यात दोेनही मजूर गंभीर जखमी झालेत. ही खळबळजनक घटना शुक्रवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास झरी तालुक्यातील मांगली येथे घडली. या घटनेने गावकरी दहशतीत असतानाच पुन्हा सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास याच वाघाने हिरापूर शेतशिवारात हिरापूर येथील माजी सरपंच देवीदास निमसटकर यांच्यावर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. त्यांना तात्काळ वणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले.
सकाळी घडलेल्या घटनेतील एका जखमीवर वणीच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर चंद्रपूर येथे हलविण्यात आले, तर एका जखमीला मुकुटबन येथून चंद्रपूर येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले. या घटनेने परिसरातील गावांमध्ये वाघाची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. सध्या मांगली येथे रस्त्याचे काम सुरू आहे. या कामासाठी पांढरकवडा तालुक्यातील पहापळ येथील काही मजूर मांगली येथे आले आहेत. शुक्रवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास या मजुरांपैैकी अनिल टेकाम(३०) रा.पहापळ व विकास वाघाडे (२८) रा.मांगली हे दोघे प्रात:र्विधीसाठी मांगली गावालगतच्या नाल्यावर गेले. याचवेळी नाल्याच्या काठावरील झुडपात एक पट्टेदार वाघ दबा धरून बसला होता. अनिल आणि विकासच्या हालचालीमुळे वाघ बिथरला आणि त्याने थेट दोघांवरही हल्ला केला. त्यामुळे हे दोघांनीही जिवाच्या आकांताने आरडाओरड सुरू केली. आजुबाजूला असलेल्या लोकांनीही आरडाओरड केल्याने वाघाने नाल्याच्या दिशेने पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच, मांगली गावातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तसेच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेत. घटनेनंतर वन कर्मचारी व पोलिसांनी वाघाचा शोध घेतला असता, दोन किलोमिटर अंतरावर एका पाणवठ्याजवळील झुडपात तो बसून असल्याचे दिसून आले. याच वाघाने सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास हिरापूर शेतशिवारात पेरणीसाठी गेलेल्या देवीदास निमसटकर यांच्यावरही हल्ला केला.

झरी तालुक्यात खरीप हंगामावर वाघाची दहशत
सध्या खरीप हंगाम सुरू झाला असून शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त आहेत. अशा स्थितीत या परिसरात वाघाचा वावर वाढल्याने शेतकरी व शेतमजुरांमध्ये वाघाची प्रचंड दहशत आहे. शेतकरी व शेतमजुरांनी शेतात जाताना एकाकी न जाता समुहाने जावे, असे आवाहन वन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

 

Web Title: Three senior critics, including former sarpanch, attacked the Tiger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.