हिवाळ्यातच तीन प्रकल्पांत ठणठणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 21:17 IST2017-12-26T21:17:22+5:302017-12-26T21:17:40+5:30
यावर्षी अपुऱ्या पावसाने जिल्ह्यातील तीन जलप्रकल्प हिवाळ्यातच कोरडे पडले. इतर मोठ्या जलाशयातही केवळ १६ टक्केच पाणी शिल्लक आहे. यामुळे यंदा उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याचा धोका वाढला आहे.

हिवाळ्यातच तीन प्रकल्पांत ठणठणात
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : यावर्षी अपुऱ्या पावसाने जिल्ह्यातील तीन जलप्रकल्प हिवाळ्यातच कोरडे पडले. इतर मोठ्या जलाशयातही केवळ १६ टक्केच पाणी शिल्लक आहे. यामुळे यंदा उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याचा धोका वाढला आहे.
जिल्ह्यातील ६२ लघु प्रकल्पांपैकी लोहतवाडी, नेर आणि बोरडा प्रकल्पात पाण्याचा थेंबही उरला नाही. इतर मोठ्या प्रकल्पांत केवळ १६ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. त्यात पूस प्रकल्पात २०.७४ टक्के, अरूणावती १४.३० टक्के, तर बेंबळा प्रकल्पात केवळ १७.१४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अडाणमध्ये २३, नवरगाव ४०, गोकी १४, वाघाडी १२, सायखेडा ८१, अधरपूस ६२, तर बोरगाव प्रकल्पात केवळ १२ टक्के जलसाठा आहे. ६२ लघु प्रकल्पांमध्ये एकूण केवळ २५ टक्के पाणी शिल्लक आहे.
हिवाळ्यातच प्रकल्प शेवटच्या घटका मोजत असल्याने येता उन्हाळा अत्यंत कठीण जाण्याचे संकेत आहे. जिल्ह्यातील ८०० च्यावर गावांमध्ये यंदा भीषण पाणीटंचाईची स्थिती आहे. यवतमाळ शहरालाही पाणीटंचाई भेडसावणार आहे. यामुळे उन्हाळ्यात जिल्ह्यात सर्वत्र पाणी पेटण्याची शक्यता वाढली आहे.
जिल्ह्यातील नियोजित प्रकल्पांमधील पाणी साठा नदीत सोडणे आणि पिण्यासाठी पाणी आरक्षित करण्याचा आराखडा तयार करण्यात आला. मात्र नियोजित पाणी साठयात मोठ्या प्रमाणात घट होत आहे. यामुळे पाण्याचे नियोजन कोलमडण्याचा धोका वर्तविला जात आहे.