विद्यार्थ्यांवरील अत्याचारात तिघे गजाआड
By Admin | Updated: September 10, 2016 00:48 IST2016-09-10T00:48:43+5:302016-09-10T00:48:43+5:30
येथील ड्रीम्स प्ले स्कूलमधील चिमुरड्या विद्यार्थ्यांवर अत्याचार प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या एका महिलेसह तिघांना

विद्यार्थ्यांवरील अत्याचारात तिघे गजाआड
वणी येथील ड्रीम्स प्ले स्कूल : महिलेचा समावेश, तीन दिवसांची पोलीस कोठडी
वणी : येथील ड्रीम्स प्ले स्कूलमधील चिमुरड्या विद्यार्थ्यांवर अत्याचार प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या एका महिलेसह तिघांना यवतमाळच्या न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पालकांच्या तक्रारीवरुन गुरुवारी उशिरा रात्री या तिघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने वणी शहरात एकच खळबळ उडाली आहे.
येथील छोरीया ले-आऊट परिसरात ड्रीम्स प्ले स्कूल आहे. तेथील चिमुरड्या विद्यार्थी-विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. गेल्या एक महिन्यापासून स्कूल बसचालक सुरेंद्र उर्फ बंडू साव, करण ब्राह्मणे बसमधून ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांचा बसमध्येच लैंगिक छळ करीत होते. याच बसवर कार्यरत महिला या कामी त्यांना मदत करीत होती, अशी सामूहिक तक्रार गुरूवारी आठ पालकांनी वणी पोलीस ठाण्यात केली. काल रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी कारवाई सुरू होती. या प्रकरणी कारवाई करण्यासाठी यवतमाळ येथून सहाय्यक पोलीस निरीक्षक राखी गेडाम येथे आल्या होत्या. त्यांच्या नियंत्रणाखाली गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली. या प्रकरणात गुरूवारी रात्री उशिरा आरोपी बसचालक सुरेंद्र उर्फ बंडू साव, करण ब्राह्मणे याच्यासह एक महिलेविरुद्ध भादंवि ३७६, २ आय, ३५४ अ (१), ३५४ ब, ५०६, १०९ पोस्को कायद्याच्या कलम ४,८,१२,२१ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. या तिघांनाही गुरूवारी अटक करण्यात आली.
शुक्रवारी दुपारी वणी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संगीता हेलोंडे यांच्या नेतृत्वातील पथक आरोपींना घेऊन यवतमाळ येथील न्यायालयापुढे हजर करण्यासाठी रवाना झाले. न्यायालयाने तीनही आरोपींना ११ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. या प्रकरणातील आरोपींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता
दरम्यान या प्रकरणी सर्व राजकीय व सामाजिक संघटनांनी शनिवारी वणी बंदचे आवाहन केले आहे. तसेच या प्रकरणाचे तपास अधिकारी मुकूंद कुळकर्णी यांनी धर्मदाय आयुक्त व तालुका दुय्यम सहाय्यक निबंधकांना पत्र लिहून ड्रीम्स प्ले स्कूल कोणत्या संस्थेअंतर्गत सुरू आहे व त्याचे संचालक कोण आहेत, अशी विचारणा करणारे पत्र पाठविले. सोमवारी या पत्राचे उत्तर मिळल्यानंतर या प्रकरणातील आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता कुळकर्णी यांनी व्यक्त केली.