तीन अपघातात पोलिसासह तीन ठार
By Admin | Updated: March 12, 2017 00:49 IST2017-03-12T00:49:41+5:302017-03-12T00:49:41+5:30
यवतमाळ, दारव्हा व अकोलाबाजार येथे घडलेल्या अपघाताच्या तीन घटनांमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांसह तीन जण ठार झाले.

तीन अपघातात पोलिसासह तीन ठार
यवतमाळ : यवतमाळ, दारव्हा व अकोलाबाजार येथे घडलेल्या अपघाताच्या तीन घटनांमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांसह तीन जण ठार झाले.
यवतमाळातील बसस्थानक चौकात शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास एम.एच.३१-ए.पी.३७३५ क्रमांकाच्या ट्रकने पोलीस दलातील मोसीन अयुब खॉ शादुल्ला खॉ यांच्या दुचाकीस (क्र.एम.एच.२९-ए.क्यू.८९७७) कट मारला. यात मोसीन खॉ गंभीर जखमी झाले. त्यांना त्वरित एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रक चालक संदीप मंदीरकर याला अटक झाली.
दुसऱ्या घटनेत पहूर नस्करी ते अकोलाबाजार मार्गावरील वळणावर सुभाष लक्ष्मण कावळे (५२) यांची दुचाकी झाडावर आदळली. यात सुभाष कावळे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांनी नुकतीच नवीन दुचाकी घेतली होती. त्यांच्या मागे आई, पत्नी, चार मुली व आप्त परिवार आहे.
तिसऱ्या घटनेत डोल्हारी शेंद्री फाट्यावर नारायण तुकाराम सोनोने (७५) जागीच ठार झाले. ही घटना शनिवारी सकाळी ११ वाजता घडली. मृत नारायण सोनोने डोल्हारी शेंद्री येथून दारव्हाकडे येणाऱ्या वाहनाची वाट बघत होते. त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. यानंतर दारव्हा येथून गावाकडे जाणारे काही व्यक्ती सदर थांब्यावर उतरले असता ते मृतावस्थेत आढळले. पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरूद्ध गुन्हा नोंद केला आहे.