अरुणावती प्रकल्पाचे तीन दरवाजे उघडले
By Admin | Updated: October 3, 2016 00:22 IST2016-10-03T00:22:09+5:302016-10-03T00:22:09+5:30
सततच्या पावसाने अरुणावती प्रकल्पात मोठ्या प्रमाणात जलसाठा झाल्याने धरणाचे तीन दरवाजे रविवारी दुपारी १२ वाजता उघडण्यात आले.

अरुणावती प्रकल्पाचे तीन दरवाजे उघडले
सतर्कतेचा इशारा : धरणात ९८ टक्के जलसाठा
दिग्रस : सततच्या पावसाने अरुणावती प्रकल्पात मोठ्या प्रमाणात जलसाठा झाल्याने धरणाचे तीन दरवाजे रविवारी दुपारी १२ वाजता उघडण्यात आले. यामुळे नदी तीरावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
अरुणावती धरणात सध्या ९८ टक्के जलसाठा झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने धरणाच्या पाण्याची पातळी कमी करण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. १ आॅक्टोबरच्या मध्यरात्री धरणाचे दोन दरवाजे १० सेमीने उघडण्यात आले होते. २ आॅक्टोबर रोजी सकाळी बंद करण्यात आले. परंतु सतत येणाऱ्या पावसाने धरणाच्या पाण्याची पातळी वाढल्याने २ आॅक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता तहसीलदार किशोर बागडे यांच्या उपस्थितीत तीन दरवाजे उघडण्यात आले. दरवाज क्र. १, ११ आणि सहा हे दरवाजे १० सेमीने उचलण्यात आले आहे. त्यामुळे अरुणावती नदीला पूर येण्याची शक्यता असून आजूबाजूंच्या गावाला दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
अरुणावती धरणाच्या पाण्याची पातळी पाहण्यासाठी तहसीलदार किशोर बागडे यांनी भेट दिली. तसेच तलाठ्यांमार्फत सतर्कतेचा इशारा देण्यात आला. यावेळी पुरवठा निरीक्षक सुधाकर राठोड, गजानन चौधरी, उपकार्यकारी अभियंता मुन्नरवार, सहायक अभियंता सागर अलाटकर उपस्थित होते. धरणात जोपर्यंत ३३०.८० टक्के जलसाठा राहील तोपर्यंत दरवाजे सुरू राहणार असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. (प्रतिनिधी)