वीज वितरणला तीन दिवसांचा अल्टिमेटम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 22:17 IST2018-06-04T22:16:55+5:302018-06-04T22:17:10+5:30
येत्या तीन दिवसांत वणी शहर व लगतच्या ग्रामीण भागातील वीज समस्या निकाली न काढल्यास वणीकर नागरिकांनी उग्र आंदोलनासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी चालविली आहे. यासंदर्भात सोमवारी वणीच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. यासाठी सर्व राजकीय पक्षातील पदाधिकारी एकवटले आहेत.

वीज वितरणला तीन दिवसांचा अल्टिमेटम
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : येत्या तीन दिवसांत वणी शहर व लगतच्या ग्रामीण भागातील वीज समस्या निकाली न काढल्यास वणीकर नागरिकांनी उग्र आंदोलनासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी चालविली आहे. यासंदर्भात सोमवारी वणीच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. यासाठी सर्व राजकीय पक्षातील पदाधिकारी एकवटले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून वणी शहरातील वीज समस्या जटील बनली आहे. दिवसांतून १५ ते २० वेळा वीज पुरवठा खंडित होत आहे. वणीचे तापमान लक्षात घेता, वीज पुरवठा खंडित झाला की, नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतो. विजेवर चालणा रे व्यवसाय ठप्प पडत आहेत. विजेचा दाब अचानक कमी जास्त होत असल्याने घरातील टि.व्ही., फ्रि ज, मिक्सर आदी उपकरणे खराब होत आहेत.
यासंदर्भात विचारणा करण्यासाठी एखाद्या अधिकाऱ्याला फोन केल्यास, एक तर संबंधित अधिकारी फोन उचलत नाही, किंवा उचलला तर त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. वणी विद्युत विभागात कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांच्यात समन्वय नसल्याने वीज समस्यांमध्ये भर पडत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. चार दिवसांपूर्वी नांदेपेरा मार्गावरील वीज कार्यालयातील तोडफोडप्रकरणी दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदन देणाºया शिष्टमंडळात राजाभाऊ पाथ्रडकर, अखिल सातोकर, विवेक मांडवकर, सिद्धीक रंगरेज, राजू तुराणकर, प्रविण खानझोडे यांच्यासह सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वणी परिसरात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे
वणी शहरात मटका, जुगार, कोळसा चोरी यासह मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू आहेत. कोळसा खाणीत शस्त्राचा धाक दाखवून कोळसा, भंगार लंपास केल्या जात आहे. यामुळे वणी शहराचा बिहार व्हायला आता वेळ लागणार नाही, असा ईशारा निवेदनातून देण्यात आला आहे. सर्व अवैध व्यवसायाला तातडीने आळा घालावा, अशी मागणी केली जात आहे.