ब्रोकरच्या आत्महत्येबाबत तिघांवर गुन्हा
By Admin | Updated: November 9, 2016 00:19 IST2016-11-09T00:19:13+5:302016-11-09T00:19:13+5:30
येथील प्रॉपर्टी ब्रोकर मनिष ढाले आत्महत्या प्रकरणात लोहारा पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला.

ब्रोकरच्या आत्महत्येबाबत तिघांवर गुन्हा
वडिलांची तक्रार : पुणे, मुंबई आणि यवतमाळच्या आरोपींचा समावेश
यवतमाळ : येथील प्रॉपर्टी ब्रोकर मनिष ढाले आत्महत्या प्रकरणात लोहारा पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. गॅस एजंसीच्या व्यवहारात फसवणूक झाल्याने आत्महत्या केल्याचा आरोप मनिषच्या वडीलांनी तक्रारीतून केला आहे.
सुरेश येरावार रा. पेशवे प्लॉट, विनोद तेलंग रा. मुबंई, नवनाथ दांडेकर र. पुणे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहे. मनीष ढाले याच्याकडून या तिघांनी मोठी रक्कम घेतली. गॅस एजन्सी खरेदीचा हा व्यवहार होता. मात्र त्यानंतर तिघांनी एजन्सीची खरेदी करून देण्यास टाळाटाळ केली. व्यवहारात फसगत झाल्याने मनिष ढाले २५ आॅक्टोबरपासून बेपत्ता होता. त्याचा मृतदेह विहिरीत आढळून आला. मनिषने आपल्या मोबाईलमध्ये व्हिडीओ तयार करून आत्महत्या का करत आहे, त्यासाठी कोण कोण जबाबदार आहे, याचे रेकॉर्डींग करून ठेवले आहे. शिवाय व्यवहारात झालेल्या फसवणुकीची माहिती कुटुंबियांना दिल्याचे सांगितले. याप्रकरणी मनिषचे वडील रामकृष्ण ढाले रा. पाटीपुरा यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपास ठाणेदार संजय डहाके यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक कवडू चांदेकर, सहायक फौजदार गणेश आगळे करत आहे. मनिषचा मोबाईल न्याय वैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविला. (कार्यालय प्रतिनिधी)