प्रतिबंधित बियाणे विकणाऱ्या तिघांना केली रंगेहात अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2022 05:00 IST2022-06-20T05:00:00+5:302022-06-20T05:00:18+5:30
शेखर तानबा झाडे (४९, रा. राम मंदिरजवळ), शुभम रामनाथजी कासारकर (२८, रा. कृष्णापूर), इम्रान नूर मोहंमद थेम (३३, रा. पोलीस स्टेशन मागे, राळेगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून प्रतिबंधित कापूस बीटी बियाण्यांच्या ११ बॅग जप्त करण्यात आल्या. सध्या शेतकरी कापूस लागवडीसाठी प्रयत्न करीत आहेत. शासनाची मान्यता नसलेल्या प्रतिबंधित बीटी बियाण्याची विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई करावी, असे आदेश आहेत.

प्रतिबंधित बियाणे विकणाऱ्या तिघांना केली रंगेहात अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
राळेगाव : शहरात प्रतिबंधित बीटी बियाण्यांची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती तालुका कृषी अधिकाऱ्यांना मिळाली. या माहितीची पडताळणी केली. नंतर स्थानिक गुन्हे शाखेतील पथकाच्या मदतीने सापळा रचून तीन आरोपींना बियाणे विकताना रंगेहाथ अटक केली. इतकेच नव्हे तर शेतातील पोल्ट्रीच्या शेडमध्ये दडवून ठेवलेली बियाणीही जप्त केली. ही कारवाई शनिवारी करण्यात आली.
शेखर तानबा झाडे (४९, रा. राम मंदिरजवळ), शुभम रामनाथजी कासारकर (२८, रा. कृष्णापूर), इम्रान नूर मोहंमद थेम (३३, रा. पोलीस स्टेशन मागे, राळेगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून प्रतिबंधित कापूस बीटी बियाण्यांच्या ११ बॅग जप्त करण्यात आल्या. सध्या शेतकरी कापूस लागवडीसाठी प्रयत्न करीत आहेत. शासनाची मान्यता नसलेल्या प्रतिबंधित बीटी बियाण्याची विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई करावी, असे आदेश आहेत.
बीटी बियाणे विक्री करणाऱ्यांचे रॅकेट उघड करण्यासाठी कृषी विभागाने डमी शेतकरी पाठविला. त्याने राळेगावातील मेटीखेडा रोडवरील रिलिएन्ट शाळेजवळ ७०० रुपये प्रतिपाकीटप्रमाणे शेखर झाडे, इम्रान थेम यांच्याकडून दोन बॅग विकत घेतल्या.
याचवेळी सापळा लावून असलेल्या पोलिसांनी झडप घातली. आरोपी शेखर झाडे, शुभम कासारकर यांना दुचाकीसह ताब्यात घेतले. त्यानंतर इम्रान थेम याच्या शेतातील पोल्ट्री शेडची झडती घेतली. तेथे बियाण्याची ११ पाकिटे आढळून आली. पाेलिसांनी आरोपींकडून ७० हजार रुपयांचा माल जप्त केला.
याप्रकरणी पर्यावरण संरक्षण अधिनियम, प्रतिबंधित बियाणे विक्री कायदा यानुसार राळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत जिल्हा कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळोदे, नीलेश ढाकूलकर यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक गणेश वनारे, अमोल मुडे, विवेक देशमुख, नीलेश राठोड, किशोर झेंडेकर, सलमान शेख, जितेंद्र चौधरी यांनी सहभाग घेतला.
या बियाण्यातून फसवणूक
- प्रतिबंध असलेल्या बियाण्याची उगवण क्षमता राहणार की नाही याची शाश्वती नसते. मागील वर्षीय अनेक शेतकऱ्यांना या बीटी बियाण्यांचा फटका बसला. कृषी विभागाकडून प्रमाणित बियाणे घेण्याचे आवाहन करण्यात आले.