लोकमत न्यूज नेटवर्क महागाव : महागाव ते उमरखेड रस्त्यावर असलेल्या दत्त मंदिरासमोरील महिला बचत गटाची इसाप बँक फोडून चोरट्यांनी तीन लाख ५५ हजार रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना महागाव शहरात बुधवारी सकाळी उघडकीला आली. बँकेचे शटर वाकवून कुलूप फोडून चोरट्यांनी बँकेतील तिजोरीवर डल्ला मारला. गावकरी सकाळी या परिसरातून फिरत असताना बँकेचे शटर वाकवून कुलूप तुटलेले आढळून आले. गावकऱ्यांनी याची माहिती तत्काळ पोलिसांना दिली ठाणेदार धनराज निळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला.
बँकेच्या सूत्राकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार तीन लाख ५५ हजार रुपये रोख रक्कम चोरी गेल्याचे सांगण्यात आले. दुपारी एक वाजेपर्यंत बँकेत कर्मचाऱ्यांसमक्ष पंचनामा कार्यवाही सुरू होती. बँकेतील सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते, याची पडताळणी बँकेच्या मुख्य कार्यालयाकडून सुरू करण्यात आली आहे. बँकेच्या अधिकाऱ्यांकडून रिचार्ज तक्रार दाखल करण्याची कार्यवाही उशिरापर्यंत सुरू होती.
शहरात दहशतीचे वातावरण
- चार दिवसांपूर्वीच दत्त मंदिर परिसरात महिलेच्या गळ्ळ्यातील सोन्याची एकदाणी हिसकावले. यातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली.
- २६ नोव्हेंबरच्या रात्री कलगाव येथे किरण मोहन भोपळे यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी साडेतीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला होता. त्याचा तपास लागलेला नाही.
- दोन डिसेंबरच्या रात्री सुशीलाबाई उत्तम गावंडे यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला होता. त्याचाही तपास अजून थंड बस्त्यात आहे. सततच्या चोऱ्यामुळे शहरांमध्ये व तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.