जिल्हा कचेरी बॉम्बने उडविण्याची धमकी
By Admin | Updated: January 19, 2017 00:53 IST2017-01-19T00:53:37+5:302017-01-19T00:53:37+5:30
येथील जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने बुधवारी सर्वत्र एकच खळबळ उडाली.

जिल्हा कचेरी बॉम्बने उडविण्याची धमकी
पत्राने खळबळ : बॉम्बशोध पथकाने केली तपासणी
यवतमाळ : येथील जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने बुधवारी सर्वत्र एकच खळबळ उडाली. दिवसभर बॉम्ब शोधक पथकाने तपासणी करून बॉम्ब नसल्याची खात्री केल्यानंतरच सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
बुधवारी नियमित कामकाज सुरू असतानाच एक पत्र जिल्हाधिकाऱ्यांच्या हाती पडले. पत्रात जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा मजकूर होता. त्यांनी लगेच पोलीस व बॉम्बशोध पथकाला पाचारण केले. बॉम्बशोध पथक, पोलीस कमांडोज, पोलीस, गोपनीय शाखेच्या कर्मचाऱ्यांचा ताफा दुपारी १:३० वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात धडकला. क्षणार्धात जिल्हा कचेरीचा संपूर्ण परिसरच सील करण्यात आला. पोलिसांनी सर्व कार्यालये ताब्यात घेतली. डॉग स्कॉडही सोबत होते. सर्वप्रथम जिल्हाधिकाऱ्यांचा कक्ष तपासण्यात आला. नंतर त्यांचे वाहन तपासले. संपूर्ण कार्यालयातील कर्मचाऱ्यांना बाहेर काढून परिसराची तपासणी करण्यात आली. परिसरातील वाहनेही बाहेर रस्त्यावर काढण्यात आली. आत जाणाऱ्या व्यक्तींची कसून तपासणी सुरू झाली. यामुळे अनेकांची तारांबळ उडाली होती. या कार्यालयात दररोज शेकडो नागरिक हजेरी लावतात. तसेच हे कार्यालय मोर्चा, निवेदन, उपोषण आणि आंदोलनाचे केंद्रबिंदू असते. कार्यालयात येणाऱ्यांची वर्दळ सतत सुरू असते. बुधवारीसुद्धा अधिकारी, कर्मचाऱ्यांसह शेकडो नागरिक या परिसरात होते.
शहरातील एका वृत्तपत्र कार्यालयातील डाकेत हे संशयीत पत्र आले होते. पत्रात ‘जिल्हाधिकारी कार्यालय १८ जानेवारी २०१७ ला बॉम्बने उडविणार’, एवढाच मजकूर लिहेलेला होता. पत्राखाली ‘एका समाज संघटनेचे नाव लिहिण्यात आले आहे. (शहर वार्ताहर)
पोलिसांचा खडा पहारा
धमकी पत्राची पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेतली. लगेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारी दोनही मुख्य दारे पोलिसांनी बंद केली. तेथे पोलीस तैनात करण्यात आले. १०० पोलीस, १५ उपनिरीक्षक आणि सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस कमांडोज, बॉम्बशोधक पथक, क्युआरटी युनिट आणि आरसीटीचे पथक बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. यामुळे या परिसरात बघ्यांचीही मोठी गर्दी झाली होती.