दारूबंदीसाठी हजारो तरुण उतरले रस्त्यावर

By Admin | Updated: September 5, 2015 02:48 IST2015-09-05T02:48:10+5:302015-09-05T02:48:10+5:30

संपूर्ण यवतमाळ जिल्हा दारूमुक्त करावा यासाठी ‘स्वामिनी’च्या हजारो तरुणांनी यवतमाळात ‘दारू चले जाव’चा नारा देत अभिनव आंदोलन केले.

Thousands of youngsters have come down to the streets for drinking | दारूबंदीसाठी हजारो तरुण उतरले रस्त्यावर

दारूबंदीसाठी हजारो तरुण उतरले रस्त्यावर

‘दारू चले जाव’ आंदोलन : गांधी जयंतीपर्यंतचा अल्टीमेटम
यवतमाळ : संपूर्ण यवतमाळ जिल्हा दारूमुक्त करावा यासाठी ‘स्वामिनी’च्या हजारो तरुणांनी यवतमाळात ‘दारू चले जाव’चा नारा देत अभिनव आंदोलन केले. गांधी जयंती २ आॅक्टोबरपर्यंत दारूबंदीसाठी शासनाला अल्टीमेटम देण्यात आला. यवतमाळच्या इतिहासात तरुणांचा निघालेला हा अलिकडच्या काळातील सर्वात मोठा मोर्चा होता.
जिल्ह्यात स्वामिनीच्या नेतृत्वात दारूबंदी आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून शुक्रवारी युवकांनी ‘दारू चले जाव’चा नारा दिला. जिल्ह्यातील विविध भागातून एकत्र आलेल्या हजारो तरूणांनी दारूबंदीसाठी पहिल्यांदाच आवाज उठविला. यापूर्वी महिलांनी दारूबंदीचा नारा दिला होता. स्थानिक पोस्टल मैदानावरून निघालेला हा मोर्चा यवतमाळकरांचे लक्ष वेधून गेला. प्रत्येक युवक आणि युवतीच्या हातात दारूविरोधी घोषणांचे फलक होते. दारूबंदीच्या घोषणाही दिल्या जात होत्या. शासनाच्या धोरणाविरोधात नारेबाजी झाली. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर सभेत रुपांतरित झाला. सभेनंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. जिल्ह्यात २ आॅक्टोबरपर्यंत दारूबंदी झाली नाही तर या पेक्षाही मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. आता मुख्यमंत्र्यांनाच घेराव घालण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी माजी मंत्री वसंतराव पुरके, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण देशमुख, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष ढवळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नानाभाऊ गाडबैले, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक वसंतराव घुईखेडकर, डॉ. रविंद्र देशमुख, पुनमताई जाजू, जिल्हा दारूबंदी आयोजनाचे संयोजक महेश पवार, बाळासाहेब सरोदे, अ‍ॅड. सीमा तेलंगे, प्रा. घनशाम दरणे, डॉ. अविनाश सावजी, प्रा.अविनाश शिर्के, प्रज्ञा चौधरी, राजू पडगीलवार, राहुल कानारकर, देवा शिवरामवार, मनिषा काटे, अंजू चिलोरकर, प्रशांत मस्के, रितेश बोबडे, नितीन कापसे, रूपेश ठाकरे, प्रकाश गोटेकर, विक्रांत पवार, पूजा राऊत, मिनाक्षी सावळकर, संजय चव्हाण, अमृता राऊत, सचिन मुंडवाईक, अविनाश गोटफोडे, देवेंद्र गणवीर, संदीप बर्वे, गिरीष नांंदगावकर, अमोल मानकर, राहुल राऊत, ज्ञानेश्वर मोटघरे, अमोल हांडे, आदी उपस्थित होते. (शहर वार्ताहर)
व्हायचे असेल महासत्ता, तर बंद करा दारूगुत्ता
दारुबंदीसाठी निघालेल्या मोर्चात बुलंद आवाजात नारे दिले जात होते. ‘व्हायचे असेल महासत्ता, तर बंद करा दारूगुत्ता’ अशी घोषणा लक्षवेधी ठरली. अशाच विविध घोषणा तरुणांनी दिल्या.
युवकांना व्यसनी बनवायचे का?
गावागावांत दारू पोहोचली आहे. नवीन दुकानांचे परवाने दिले जात आहे. तरूणांना व्यसनाधीन बनवायचे काय, असा खडा सवाल यावेळी स्वामिनीचे संयोजक महेश पवार यांनी केला.

Web Title: Thousands of youngsters have come down to the streets for drinking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.