हजारो क्विंटल सोयाबीन उघड्यावर
By Admin | Updated: October 10, 2015 01:58 IST2015-10-10T01:58:20+5:302015-10-10T01:58:20+5:30
शेतकऱ्यांच्या सोयीसाठी असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या शेतकऱ्यांचीच मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

हजारो क्विंटल सोयाबीन उघड्यावर
शेतकरी भडकले : यवतमाळ बाजार समितीत मोठ्या प्रमाणात गैरसोय
यवतमाळ : शेतकऱ्यांच्या सोयीसाठी असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या शेतकऱ्यांचीच मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. सुसज्ज शेड असूनही बाजार समितीत विक्रीस आलेले तब्बल साडेतीन हजार क्विंटल सोयाबीन उघड्यावरच पडून आहे. शुक्रवारी या समस्येमुळे शेतकरी बाजार समिती प्रशासनाविरुद्ध भडकले होते.
शेतकऱ्यांचे सोयाबीन निघणे सुरू झाले आहे. तसेच दसऱ्याचा सण तोंडावर असल्याने बाजार समितीमध्ये सोयाबीन मोठ्या प्रमाणात विक्रीस आणले जात आहे. हे सोयाबीन सामावून घेण्याची क्षमता यवतमाळ बाजार समितीमध्ये आहे. मात्र, नियोजन नसल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. शेतमाल ठेवण्यासाठी बाजार समितीत तीन सुसज्ज शेड आहेत. जवळपास १० हजार पोती ठेवण्याची क्षमता या शेडची आहे. तरीही साडेतीन हजार क्विंटल सोयाबीन शुक्रवारी शेतकऱ्यांना उघड्यावरच ठेवावे लागले. यामागे बाजार समितीचा नियोजनशून्य कारभार असल्याची संतप्त भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
गुरुवारपर्यंत खरेदी केलेला माल शेडमध्येच ठेवण्यात आला आहे. या मालाचा ‘पाला’ (मिसळणे) वेळेत करण्यात आला नाही. त्यामुळे पुढील प्रक्रियाही खोळंबली आहे. जवळपास १० हजार पोती उचललीच न गेल्याने नवीन आलेला माल शेडमध्ये ठेवण्यासाठी जागाच नाही. त्यातच शुक्रवारी बाजार समितीत साधारण साडेतीन हजार क्विंटल सोयाबीनची आवाक झाली. मात्र शेडमध्ये जागा नसल्याने शेतकऱ्यांना आपला माल उघड्यावर ठेवून खरेदीसाठी वाट पहावी लागली. या सोयाबीनची उघड्यवरच बोली लावली जात होती.
विशेष म्हणजे, सोयाबीनची आवक वाढताच खरेदीदारांनी लगेच भावही पाडले. गुरुवारपेक्षा शुक्रवारी सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात झाली. गुरुवारपर्यंत सोयाबीनला ३८०० ते ३९०० रुपये भाव होता. मात्र, शुक्रवारी आवक वाढताच हे भाव ३७०० रुपयांपर्यंत पाडण्यात आले. त्यामुळेही शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला. गुरूवारच्याच भावाने सोयाबीन खरेदी करण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. मात्र बाजार समितीकडून या मागणीची दखल घेण्यात आली नाही.
दरम्यान, यासंदर्भात बाजार समितीचे सचिव संजय भेंडारकर म्हणाले की, पुढील तीन दिवस बाजार समितीला सुटी आहे. त्यामुळे माल खरेदी होणार नाही. शेडमधील माल आजच मार्गी लावला जाईल. परंतु, बाजार समितीत बाहेरचे व्यापारी फारच कमी प्रमाणात असल्याने स्पर्धा कमी आहे. त्याचा गैरफायदा घेत भाव पाडले जातात, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. (शहर वार्ताहर)