हजारांवर शेतकरी तिष्ठत
By Admin | Updated: March 24, 2017 02:15 IST2017-03-24T02:15:21+5:302017-03-24T02:15:21+5:30
बारदाना नसल्याचे कारण पुढे करून नाफेडने पुन्हा एकदा तूर खरेदी बुधवारपासून पुढील आदेशापर्यंत बंद केल्याने तूर उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे.

हजारांवर शेतकरी तिष्ठत
खासगी व्यापाऱ्यांकडून लूट : बारदान्याअभावी तूर खरेदी थांबली
वणी : बारदाना नसल्याचे कारण पुढे करून नाफेडने पुन्हा एकदा तूर खरेदी बुधवारपासून पुढील आदेशापर्यंत बंद केल्याने तूर उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. याचाच फायदा खासगी व्यापारी घेत आहे. चार हजार ते चार हजार २०० रुपये प्रति क्विंटल भावाने खासगी व्यापाऱ्यांकडून तुरीची खरेदी केली जात असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. तूर विक्रीसाठी अद्याप ९०० शेतकरी तिष्ठत उभे आहेत. त्यांना बारदाणा येण्याची प्रतीक्षा आहे.
मागील वर्षी तुरीला चांगला भाव मिळाल्याने यंदा वणी उपविभागात तुरीचा पेरा वाढला. तुरीचे उत्पादनही चांगले झाले. शेतकऱ्यांजवळील शेवटच्या दाण्यापर्यंत तूर खरेदी केली जाईल, अशी गगनभेदी घोषणा शासनाने केली होती.
त्यानुसार वणी कृषी उत्पन्ना बाजार समितीत सरकारची एजन्सी असलेल्या नाफेड मार्फत १३ जानेवारीपासून तूर खरेदीला प्रारंभ केला. ३१ जानेवारीपासून प्रत्यक्ष नाफेडकडे तुरीची आवक सुरू झाली. तत्पूर्वी तूर खरेदीसाठी २० नोव्हेंबरला १० गाठी बारदाणा आला. मात्र तुरीची आवक पाहता हा बारदाणा लवकरच संपल्याने नाफेडला २ फेब्रुवारीपासून तूर खरेदी बंद करावी लागली. त्यानंतर १८ फेब्रुवारीला १० गाठी बारदाणा नाफेडला प्राप्त झाला. १० मार्चला पुन्हा पाच गाठी व १४ मार्चला ५ गाठी असा एकूण आतापर्यंत ३० गाठी बारदाणा नाफेडला प्राप्त झाला. मात्र २२ मार्चला बारदाणा संपल्याने नाफेडने पुन्हा तुरीची खरेदी बंद केली आहे. आता पुन्हा बारदाणा कधी येईल, हे नाफेडच्या अधिकाऱ्यांनादेखील माहित नाही.
तूर खेरदी बंद झाल्यानंतर ४५० शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी नाफेडकडून टोकन घेतले आहे, तर आणखी टोकन न घेतलेले ४५० शेतकरी तूर खरेदीची प्रतीक्षा करीत असल्याची माहिती वणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अ.का.झाडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. तूर खरेदीच्या प्रारंभापासून २२ मार्चपर्यंत नाफेडने सहा हजार ९०१ क्विंटल तुरीची खरेदी केली. त्याची किंमत तीन कोटी ४८ लाख ५१ हजार ९६९ इतकी आहे. ५०९ शेतकऱ्यांनी बुधवारपर्यंत नाफेडला आपली तूर विकली. (कार्यालय प्रतिनिधी)