शंभरात मागणाऱ्यांना मिळाला कमी दर

By Admin | Updated: November 10, 2016 01:37 IST2016-11-10T01:37:45+5:302016-11-10T01:37:45+5:30

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्यांनी ५०० आणि एक हजार रुपयांची नोट बंद झाल्याने शेतकऱ्यांचीही पिळवणूक करण्याची संधी सोडली नाही.

Those who sought it in the hundreds of low rates | शंभरात मागणाऱ्यांना मिळाला कमी दर

शंभरात मागणाऱ्यांना मिळाला कमी दर

नेर बाजार समिती : शेतकऱ्यांच्या पिळवणुकीचा नवीन फंडा
नेर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्यांनी ५०० आणि एक हजार रुपयांची नोट बंद झाल्याने शेतकऱ्यांचीही पिळवणूक करण्याची संधी सोडली नाही. बंद झालेली नोट घेण्यास तयार असलेल्या शेतकऱ्यांच्या कापसाला चार हजार ८०० रुपये तर ५० आणि १०० रुपयांच्या नोटा मागणाऱ्या शेतकऱ्यांना चार हजार ६०० रुपये दर सुरू केला. पिळवणुकीच्या या नवीन प्रकाराने शेतकरी कमालीचे संतप्त झाले होते.
यावर्षी सोयाबीन पाण्यात सापडल्याने बळीराजाला ओला दुष्काळाचा सामना करावा लागला. परिणामी त्यांची दिवाळी अंधारात गेली. सोयाबीनला चांगला भाव मिळेल या स्वप्नात असताना व्यापाऱ्यांनी दोन हजार ते दोन हजार ५०० रुपयांपर्यंत सोयाबीन खरेदी केले. आता कपाशीला चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा ठेऊन बाजारात विक्रीसाठी आणली. परंतु याही ठिकाणी अतिशय वाईट अनुभव त्यांना आला. ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद झाल्याची संधी साधत व्यापाऱ्यांनी त्यांची आर्थिक पिळवणूक केली.
व्यापारी आणि अडत्यांनी ही संधी चांगलीच हेरली. बंद झालेल्या नोटा स्वीकारण्याची तयारी दर्शविणाऱ्या शेतकऱ्यांच्या कापसाला थोडाफार अधिक तर नाकारणाऱ्या शेतकऱ्यांच्या कापसाला १५० ते २०० रुपये दर क्विंटलमागे कमी देण्यात आला. ही बाब काही शेतकऱ्यांनी बाजार समिती प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्यावेळी व्यापाऱ्यांनी सारवासारव सुरू केली. मात्र तोपर्यंत व्यापाऱ्यांनी शेकडो क्विंटल कापसाची खरेदी याच पद्धतीने केली होती. नोटा बंद झाल्याचा परिणाम शहरातील बाजारपेठेतही दिसून आला. दुकाने, रुग्णालये, मेडिकल बंद ठेवण्यात आले होते.
दरम्यान, बाजार समितीत घडलेल्या प्रकाराविषयी आसोला येथील डॉ. अजय राठोड यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. याबाबत संंबंधितांकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावर सभापती रवींद्र राऊत यांनी आपण व्यापाऱ्यांना तंबी दिली असल्याचे सांगितले. पिळवणूक होत असल्यास शेतकऱ्यांनी आपल्याशी थेट संपर्क करावा, असे ते म्हणाले. तर प्रभारी सचिव विष्णूपंत खेरे यांनी फसवणुकीचा प्रकार घडत असल्यास शेतकऱ्यांनी माहिती द्यावी, संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
नेर बाजार समितीत शेतकऱ्यांची पिळवणूक हा प्रकार नवीन नाही. संधीचा फायदा व्यापाऱ्यांकडून घेतला जातो. बुधवारीही नोटा बंदच्या निमत्तानेयाचा प्रत्यय शेतकऱ्यांना आला. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Those who sought it in the hundreds of low rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.