ठोकळ, ठाकरे, चव्हाण, खांदवे यांची वर्णी
By Admin | Updated: October 3, 2014 02:13 IST2014-10-03T02:13:54+5:302014-10-03T02:13:54+5:30
जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतींची गुरूवारी निवड करण्यात आली. यामध्ये राष्ट्रवादीकडून सुभाष ठोकळ, लता खांदवे तर कांग्रेसचे नरेंद्र ठाकरे, विमल चव्हाण यांची बहुमताने निवड करण्यात आली.

ठोकळ, ठाकरे, चव्हाण, खांदवे यांची वर्णी
यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतींची गुरूवारी निवड करण्यात आली. यामध्ये राष्ट्रवादीकडून सुभाष ठोकळ, लता खांदवे तर कांग्रेसचे नरेंद्र ठाकरे, विमल चव्हाण यांची बहुमताने निवड करण्यात आली. राज्यातील आघाडीत बिघाडी आल्यानंतरही जिल्हा परिषदेत मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी आणि सेना-भाजपा युती कायम आहे.
आचार संहिता असल्याने सभापतींच्या निवड प्रक्रियेनंतर लागलीच खाते वाटप करता येत नाही. त्यामुळे सुभाष ठोकळ आणि नरेंद्र ठाकरे यांचे खाते कोणते हे अजून तरी ठरलेले नाही. याउलट महिला व बाल कल्याण आणि समाज कल्याण समिती ही शासनस्तरावरूनच निर्देशित करण्यात आली आहे. यात महिला बाल कल्याण सभापती म्हणून उमरखेड तालुक्यातील पोफाळी सर्कच्या विमल रमेश चव्हाण यांची तर समाज कल्याण सभापतीपदी वडगाव सर्कलच्या लता खांदवे यांची निवड झाली. या दोन्ही सभापतींविरूद्ध शिवसेनेकडून संगीता इंगोले आणि भाजपाकडून उषा राठोड यांनी नामांकन दाखल केले होते. तर सुभाष ठोकळ यांच्याविरोधात प्रवीण उईके, नरेंद्र ठाकरे यांच्या विरोधात दिवाकर राठोड यांनी नामांकन दाखल केले. या मतदान प्रक्रियेत आघाडीच्या उमेदवारांना ४४ मते मिळाली. युतीच्या उमेदवारांना १६ मते मिळाली. निवड प्रक्रियेला काँग्रेसचे देवानंद पवार आणि भाजपाचे शंकर पांढरे गैरहजर होते. आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर उरलेल्या सहा विभागांपैकी कृषी व पशूसंवर्धन हे दोन विभाग वगळता उर्वरित अर्थ-बांधाकाम, शिक्षण-आरोग्य या चार विभागांची सोयीने जोडतोड करता येणार आहे. तर पाणीपुरवठा आणि स्थायी समितीचा पदसिद्ध सभापती हा जिल्हा परिषद अध्यक्षच राहतो. त्यामुळे आजच्या निवडप्रक्रियेने केवळ दोन समित्यांचे सभापती ठरलेले आहे. उरलेल्या दोन सभापतींकडे कुठल्या समित्या येतात हे सर्वसाधारण सभेनंतरच स्पष्ट होणार आहे.
जिल्हा परिषदेतील पदे वाटपात सुरूवातीपासूनच यवतमाळ विधानसभेचा दबदबा राहिला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षातील प्रमुख नेते मंडळी यवतमाळातून निवडणूक लढवित असल्याने ही राजकीय गुंतवणूक करण्यात आली आहे. यापूर्वी यवतमाळ विधानसभेतील सुभाष ठोकळ (राष्ट्रवादी), प्रभाकर उईके (शिवसेना), मनमोहनसिंग चव्हाण (शिवसेना) या तिघांना सभापती पद देण्यात आले होते. आता काँग्रेसने जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद बाळासाहेब मांगूळकर यांना दिले आहे. तर राष्ट्रवादीने सुभाष ठोकळ यांची पुन्हा वर्णी लावली आहे. याशिवाय समाज कल्याण सभापती म्हणून यवतमाळ शहरालगतच्या वडगाव सर्कलमधील लता खांदवे यांना संधी देऊन सोयीचे राजकीय संतुलन राखण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रक्रियेत महागाव तालुक्यातील सदस्यांच्या तोंडाल पाने पुसण्यात आली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)