कोरोना संशयितांचे ३१ नमुने निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 05:00 IST2020-04-11T05:00:00+5:302020-04-11T05:00:34+5:30

कोरोना संशयित आठ रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा कमालीची गतिमान झाली. भोसा रोडवरील ३८ नगर-कॉलन्यांचा परिसर सील करण्यात आला आहे. तेथे ८०० पोलीस व होमगार्डचा कडक पहारा आहे. हे आठ पॉझिटीव्ह नेमके कुणाकुणाच्या संपर्कात आले, त्यांचा शोध घेऊन त्यांना विलगीकरण कक्षात दाखल केले जात आहे. सध्या या कक्षातील संख्या १११ वर पोहोचली आहे.

Thirty one samples of Corona suspects negative | कोरोना संशयितांचे ३१ नमुने निगेटिव्ह

कोरोना संशयितांचे ३१ नमुने निगेटिव्ह

ठळक मुद्देआणखी १५२ नमुने पाठविले : अहवालावर ठरणार यवतमाळच्या लॉकडाऊनचे भवितव्य

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोना संसर्गाच्या संशयावरून यवतमाळात दररोज नवनवे रुग्ण दाखल होत असून त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविले जात आहे. यापूर्वी पाठविलेल्या ७८ पैकी ३१ नमुन्यांचे अहवाल शुक्रवारी प्राप्त झाले असून ते निगेटीव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेला व प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.
कोरोना संशयित आठ रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा कमालीची गतिमान झाली. भोसा रोडवरील ३८ नगर-कॉलन्यांचा परिसर सील करण्यात आला आहे. तेथे ८०० पोलीस व होमगार्डचा कडक पहारा आहे. हे आठ पॉझिटीव्ह नेमके कुणाकुणाच्या संपर्कात आले, त्यांचा शोध घेऊन त्यांना विलगीकरण कक्षात दाखल केले जात आहे. सध्या या कक्षातील संख्या १११ वर पोहोचली आहे. आणखी तब्बल १५२ जणांचे नमुने नागपूरला तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. या नमुन्यांचा अहवाल नेमका काय येतो यावर बरेच काही अवलंबून आहे. हे अहवाल निगेटीव्ह आल्यास यवतमाळचे लॉकडाऊन हटवायचे काय, कोणती दुकाने सुरू ठेवायची, त्याचा वेळ काय असावा याबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी ‘लोकमत’ला दिली. त्यामुळे या १५२ अहवालांकडे शासकीय यंत्रणेचे लक्ष लागले आहे.
आठ पॉझिटीव्ह रुग्णांचा वावर राहिलेल्या व पोलिसांनी सध्या संपूर्ण परिसरच सील केलेल्या भागात घरोघरी सर्वेक्षण करून रक्ताचे नमुने घेतले जात आहे. टप्प्याटप्प्याने त्याची तपासणी केली जाणार आहे. त्या भागातील तब्बल ३० जणांना ताप असल्याची गंभीरबाब पुढे आली. प्रायोगिक तत्वावर त्यातील दहा जणांचे रक्त नमुने तपासणीसाठी घेतले जाणार आहे. दरम्यान कोरोनाची बाधा झालेल्या त्या आठ रुग्णांची प्रकृती उत्तम असून त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी उपचार केले जात असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

सोमवारपासून बँका सकाळी ८ वाजता
जनधन खात्यातील ५०० रुपये काढण्यासाठी तमाम बँकांसमोर जिल्हाभर होणारी गर्दी टाळण्यासाठी आता सोमवारपासून बँका सकाळी ८ वाजतापासून सुरू होणार आहेत. दुपारी १२ पर्यंत बँकांचे कामकाज चालेल. पैसे काढणे, टाकणे, ट्रान्सफर करणे आणि बॅलन्स तपासणे एवढीच कामे या काळात होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ९ एप्रिल रोजी बँकांच्या सुधारित वेळांचा हा आदेश जारी केला. सध्या बँकांपुढे गर्दी होत असल्याने सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. त्यामुळे सावधगिरी म्हणून आणि नागरिकांचा कडाक्याच्या उन्हातील तासन्तास बँकेपुढे उभे राहण्याचा त्रास वाचविण्यासाठी बँका आता सकाळी ८ वाजतापासूनच उघडण्याचे आदेश देण्यात आले आहे.
 

Web Title: Thirty one samples of Corona suspects negative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.