जिल्ह्यातील धरणे भागविणार मराठवाड्याची तहान

By Admin | Updated: September 10, 2015 03:00 IST2015-09-10T03:00:58+5:302015-09-10T03:00:58+5:30

मराठवाड्यातील दुष्काळ व पाणीटंचाईवर मात करण्यासाठी लगतच्या जिल्ह्यातील धरणांमधून रेल्वेद्वारे पाणी पोहोचविण्याची सरकारची योजना आहे.

Thirst for Marathwada | जिल्ह्यातील धरणे भागविणार मराठवाड्याची तहान

जिल्ह्यातील धरणे भागविणार मराठवाड्याची तहान

यवतमाळ : मराठवाड्यातील दुष्काळ व पाणीटंचाईवर मात करण्यासाठी लगतच्या जिल्ह्यातील धरणांमधून रेल्वेद्वारे पाणी पोहोचविण्याची सरकारची योजना आहे. त्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील काही धरणांवर सरकारची नजर आहे. या धरणांमधून मराठवाड्याची तहान भागविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
मराठवाड्यात निसर्गाने दगा दिल्याने यंदा प्रचंड दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. सिंचन आणि जनावरांसाठी पाणी तर दूर माणसांनाही पिण्यासाठी पाणी मिळेनासे झाले आहे. या दुष्काळाने राज्यातील भाजपा-शिवसेना युतीच्या सरकारची चिंता वाढविली आहे. या दुष्काळावर मात करण्यासाठी नवनवीन उपाययोजना शोधल्या जात आहे. मराठवाड्याला लागून असलेल्या आणि रेल्वे ट्रॅकच्या जवळपास असलेल्या विदर्भातील धरणांचा आढावा घेतला जात आहे. विदर्भातील कोणते मोठे प्रकल्प भरले, त्यात किती पाणीसाठा आहे आणि या धरणापासून जवळचे रेल्वे स्टेशन कोणते यावर अभ्यास केला जात आहे. अर्थात रेल्वेने मराठवाड्यात पाणी पोहोचविण्याची सरकारची योजना आहे. त्यात यवतमाळ जिल्ह्याचेही योगदान राहणार आहे.
बाभूळगाव तालुक्यातील बेंबळा प्रकल्पाबाबत सरकारचा विचार सुरू आहे. बेंबळा धरणापासून अवघ्या २५ ते ३० किलोमीटर अंतरावर धामणगाव रेल्वे स्टेशन आहे. धरणातील पाणी टँकरने या स्टेशनपर्यंत पोहोचवून तेथून वॅगनद्वारे ते मराठवाड्यात नेण्याचा विचार केला जात आहे. याच अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच बेंबळा प्रकल्पाला भेट देऊन पाणीसाठ्याची पाहणी केली. कालव्याद्वारे हे पाणी वर्धा जिल्ह्यातील रेल्वे ट्रॅकचे अंतर गाठू शकते का या दृष्टीनेही चाचपणी केली जात आहे.
मराठवाड्यात रेल्वेने पाणी पोहोचविण्याच्या दृष्टीने मारेगाव तालुक्यातील नवरगाव, पुसद तालुक्यातील उर्ध्व पैनगंगा नदीवरील इसापूर या धरणांचाही विचार केला जाऊ शकतो.
नवरगाव हा मध्यम प्रकल्प असून निर्गुडा नदी काठावरील गावांची तहान भागवितो. येथून रेल्वे ट्रॅक ३० किलोमीटर असल्याचे सांगितले जाते. हे धरण सध्या ६५ टक्के भरले आहे. त्यातील पाण्याचा सिंचनासाठी फार उपयोग होत नाही. पांढरकवडा तालुक्यातील सायखेडा येथेही धरण आहे. मात्र तेथून रेल्वे ट्रॅक बराच दूर आहे.
इसापूर धरणापासून हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीला ३० किलोमीटरवर रेल्वे ट्रॅक असल्याचे सांगितले जाते. पुसद तालुक्यातील पूस नदीतून पाणी न्यायचे असल्यास १२० किलोमीटर नांदेड व ९० किलोमीटर किनवट एवढे अंतर रेल्वे ट्रॅक गाठण्यासाठी पाण्याची वाहतूक करावी लागणार आहे. जिल्ह्यात दारव्हा तालुक्यातील अडाण, दिग्रसमधील अरुणावती हीसुद्धा मोठी धरणे आहेत. मात्र त्यातील पाणी रेल्वेने पोहोचविणे सरकारला परवडणारे नाही. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Thirst for Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.