मोरवा येथील कापूस व्यापाऱ्याच्या खुनाचा तिसऱ्या दिवशीही सुगावा नाही
By Admin | Updated: December 30, 2016 00:14 IST2016-12-30T00:14:10+5:302016-12-30T00:14:10+5:30
पांढरकवडा तालुक्यातील मोरवा येथील कापूस व सोयाबीनचे व्यापारी काशीनाथ डंभारे यांचा मंगळवारी रस्त्यात खून करण्यात आला होता.

मोरवा येथील कापूस व्यापाऱ्याच्या खुनाचा तिसऱ्या दिवशीही सुगावा नाही
रुंझा : पांढरकवडा तालुक्यातील मोरवा येथील कापूस व सोयाबीनचे व्यापारी काशीनाथ डंभारे यांचा मंगळवारी रस्त्यात खून करण्यात आला होता. आज तिसरा दिवस उजाडूनही मारेकऱ्यांचा कोणताही सुगावा पोलिसांना लागलेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. मुकिंदा डंभारे हे सायखेडा गावात कापूस व सोयाबीनच्या खरेदी विक्रीचा गेल्या अनेक वर्षांपासून व्यवसाय करीत होते. घटनेच्या दिवशी सकाळी सायखेडासाठी गेले होते. मालाच्या चुकाऱ्यासाठी शेतकरी सायखेडा येथील त्यांच्या गोदामाजवळ वाट पाहात बसले होते व मोबाईलवर त्यांच्याशी वारंवार संपर्कही साधत होते. आता पोहोचत आहो, असे उत्तर त्यांनी दिले होते. काही वेळाने फोन मात्र स्विच आॅफ आला. तेव्हा उपस्थित शेतकऱ्यांनी त्यांच्या मुलाच्या मोबाईलवर संपर्क साधून विचारणा केली. तेव्हा त्याने बाबाला सायखेडासाठी जावून बराच वेळ झाल्याचे सांगितले. त्यामुळे उपस्थित शेतकऱ्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि लोकांनी सायखेडा ते मोरवा रस्त्याच्या पाऊलवाटेवर शोधमोहीम राबविली. तेव्हा काही वेळाने हेमापुरे यांच्या कपाशीच्या शेताजवळ डंभारे मृतावस्थेत आढळून आले. घरून निघतानाच डंभारे यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे पैसे देण्यासाठी ५० हजार रुपये सोबत घेतले असल्याचे मुलगा सुमित याने सांगितले. त्यामुळे पैशांसाठी हा खून झाला की अन्य काही याचाही शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. याप्रकरणातील मारेकऱ्यांचा शोध घेण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. (वार्ताहर)