चोरट्याने केला पुजाऱ्याचा खून

By Admin | Updated: July 3, 2015 00:11 IST2015-07-03T00:11:43+5:302015-07-03T00:11:43+5:30

दारव्हा तालुक्याच्या गोखी येथील पुजाऱ्याचा खून एका चोरट्याने केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

The thieves threw the priest's blood | चोरट्याने केला पुजाऱ्याचा खून

चोरट्याने केला पुजाऱ्याचा खून

सहा महिन्यानंतर रहस्य उलगडले : ठाणे जिल्ह्यातून अटक
सोनखास : दारव्हा तालुक्याच्या गोखी येथील पुजाऱ्याचा खून एका चोरट्याने केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. चोरीच्या उद्देशाने मंदिर परिसरात फिरत असताना पुजाऱ्याने हटकले या क्षुल्लक कारणावरून हा खून करण्यात आला. पोलिसांनी घटनेच्या तब्बल सहा महिन्यानंतर यातील आरोपीला ठाणे जिल्ह्यातून अटक केली आहे.
लखन देविदास राठोड (२२) रा. मोरगव्हाण ता. दारव्हा असे या आरोपीचे नाव आहे. गोखीच्या मारूती मंदिरात पुजारी म्हणून सेवारत सदाशिवराव गोविंदराव डहाके (६०) यांचा २९ डिसेंबर २०१४ रोजी खून करण्यात आला होता. घटनास्थळी सापडलेल्या एका मोबाईलवरुन पोलिसांनी मारेकऱ्याचा माग काढला. या मोबाईलमध्ये घाटंजी येथील राजेश राठोड या युवकाच्या नावाचे सीमकार्ड आढळले होते. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता हा फोन लखन राठोड वापरत असल्याचे निष्पन्न झाले. पुजाऱ्याच्या खुनामागे लखनचाच हात असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला. तो रोजगाराच्या शोधात ठाणे जिल्ह्यातील अमरनाथ येथे असल्याची माहिती मिळाल्यावरून लाडखेडचे फौजदार रवी वावडे यांच्या नेतृत्वातील पथकाने बुधवारी तेथून लखनला अटक केली. घटनेच्या रात्री लखन गोखीच्या मंदिर परिसरात गेला होता. त्याने या मंदिराच्या ओट्यावर झोपण्याचा प्रयत्न केला. मात्र पुजाऱ्याने या अनोळखी लखनला तेथे झोपण्यापासून रोखले होते. नेमका हाच राग मनात धरुन लखनने तेथे पडलेल्या काठीने पुजाऱ्यावर हल्ला केला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. लखन याच्यावर लाडखेड पोलीस ठाण्यात चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. घटनेच्या रात्रीसुद्धा तो असाच चोरीच्या उद्देशाने गोखी परिसरात फिरत असावा व पुजाऱ्याला संशय आल्यानेच त्याला हटकले असावे, असा कयास पोलीस वर्तवित आहे. लखनकडून आणखीही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. आरोपीला अटक करणाऱ्या पोलीस पथकात राजेश हनवतकर, स्थानिक गुन्हे शाखेचे वासू साठवणे, साहेबराव राठोड यांचा समावेश आहे. पुजाऱ्याच्या खुनातील आरोपीला अटक झाल्याने नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे. (वार्ताहर)

Web Title: The thieves threw the priest's blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.