क्षणिक मोहाने निष्ठा ठरली चोर

By Admin | Updated: October 23, 2016 02:06 IST2016-10-23T02:06:56+5:302016-10-23T02:06:56+5:30

धन्याप्रती निष्ठा दाखविण्याची अनेक उदाहरणे समाजात पाहावयास मिळतात. कामाची पध्दत आणि वक्तशीरपणा यामुळे पगारी नोकरसुध्दा कुटुंबातील एक सदस्य होतो.

Thieves with loyal love for a momentary moment | क्षणिक मोहाने निष्ठा ठरली चोर

क्षणिक मोहाने निष्ठा ठरली चोर

धन्याप्रती निष्ठा दाखविण्याची अनेक उदाहरणे समाजात पाहावयास मिळतात. कामाची पध्दत आणि वक्तशीरपणा यामुळे पगारी नोकरसुध्दा कुटुंबातील एक सदस्य होतो. यातून मालक नोकरी ही दरी कमी होते. प्रत्येक गोष्ट आत्मीयतेने आपल्या नोकरासोबत चर्चीली जाते. मग तो व्यावसायिक असो किंवा एखाद्या घरात काम करणारी गृहिणी असो. त्यांच्यातील विश्वासाचे नात्यानेच कारभार सुरू असतो. अशीच सलग दहा वर्षे निष्ठेने सेवा देणाऱ्या नोकरांची क्षणिक मोहाने दिशाभूल झाली, अन् त्याची हीच निष्ठा कायद्याच्या भाषेत चोर ठरली. यवतमाळ शहरात घडलेल्या दरोड्याच्या घटनेने मालक-नोकर या व्यावहारिक नात्यातील निष्ठा हरविली की काय होते याचा प्रत्यय दिला आहे.
यवतमाळच्या सेमिनरी ले-आऊटमधील धान्य व्यापारी अनिल खिवंसरा यांच्या घरी दुपारी ३ वाजताच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला. यावेळी घरात मालकीन आणि तिची विश्वासू मोलकरीण होती. पोलिसांनी सुरुवातीलाच मोकरणीला आपल्या पध्दतीने चौकशीचा प्रयत्न केला. मात्र यावेळी खिवंसरा कुटुंबातील सर्वच सदस्यांनी पोलिसांच्या या कृतीला तीव्र विरोध केला. तुमचा तपास दुसऱ्या दिशेने करा, ती मोलकरीण नव्हे आमच्या घरातील सदस्य आहे, असा विश्वास बोलून दाखविला. त्यानंतर या गुन्ह्याच्या छडा लागला. तब्बल १५ आरोपी अटक करण्यात आले. तेव्हा पहिल्यांदा संशय घेतलेल्या मोलकरणीपासूनच दरोड्याची आखणी झाल्याचे स्पष्ट झाले. प्रेमिला भीमराव मडावी (रा.वंजारी फैल, यवतमाळ) ही ८ वर्षांपासून खिवंसरा कुटुंबात वावरत होती. अचानक तिने काही महिन्यांपूर्वी मालकाकडे मोठी रक्कम असल्याचे पती भीमराव याच्याजवळ बोलून दाखविले. यावर भीमरावने कळंब येथील गवंडी काम करणाऱ्या मित्रासोबत चर्चा केली. त्यानंतर नागपुरातील महिलेच्या माध्यमातून दिवसा दरोडा टाकण्याचा कट रचला गेला. या गुन्ह्यात सर्वच वयोगटातील आरोपींचा समावेश आहे. दरोड्यासारखी घटना, तिही दिवसा याची आखणी कधीही गुन्हा न केलेल्यांनी करावी, ही बाब पोलिसांनाही धक्का देणारी आहे. केवळ काही भोंदूबाबांच्या नादी लागून दरोड्यासारख्या गुन्ह्याचे पातक या आरोपींनी केले. गुन्ह्यातील साखळी जोडणाऱ्या महिलेने दरोडा पडण्यापूर्वीच आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या गुन्ह्यात टेलरिंग काम करणारा, रोजमजुरी करणारा, रेल्वेतील नोकरीत रुजू होण्यासाठी आॅर्डरच्या प्रतीक्षेत असलेला, नागपुरातील पाथर्डी परिसरातील झोपडपट्टी परिसरात राहून घरकाम करणारी इमली उर्फ प्रिया यादव ही तरुणी यांचा गुन्ह्यात सक्रिय सहभाग होता. एखाद्या चित्रपटाच्या कथानकाप्रमाणे कल्पना विलासात जगणाऱ्या या सर्वांनी ४० कोटींची रक्कम आपल्या हाती लागेल, तथाकथीत भोंदूबाबाच्या जादूमुळे हा दरोडा यशस्वी होईल, कुणी आपल्याला ओळखू शकणार नाही या समजुतीतून हे धाडस केले. शेवटी गुन्ह्यानंतर आठच दिवसात पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. दरोड्यात नागपूरहून यवतमाळसाठी लागणाऱ्या प्रवासभाड्याइतकीही रक्कम हाती लागली नाही. श्रम करून रोजीरोटी कमविणाऱ्यांना अचानक गर्भश्रीमंतांच्या जीवनशैलीचे डोहाळे लागले. यातूनच ही घटना घडल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
खिवंसरा यांच्या घरी ४० कोटीपेक्षा अधिक रोख रक्कम असल्याची बाब पतीच्या कानावर टाकणाऱ्या प्रेमिला हिच्यामुळेच ही घटना घडली. प्रेमिला ही तिच्या मालकीणच्या अतिशय विश्वासातील होती. दरोडा पडला त्या दिवशी मालकीनला वाचविण्यासाठी तिने स्वत: समोर येण्याचा देखावा केला. काहीही न्या, माझ्या मालकीणला धक्का लावू नका असे तिने सशस्त्र दरोडेखोरांना सांगितले. त्यानंतर स्वत:च बेडरुममधील लाकडी कपाट दरोडेखोरांना दाखविले. इतकेच नव्हे तर परत जाताना या दरोडेखोरांनी तिलाही बांधून ठेवा, असे सुनावले. यावरून दरोडेखोरांनी सोबत आणलेल्या पॅकिंग टेपने मालकीनसोबत प्रेमिला हिलाही बांधून ठेवले. येथेच तिची फसगत झाली. हाती काहीच लागले नसताना दरोडेखोरांनी प्रेमिलाच्या सांगण्यावरून तिच्या मालकीणच्या अंगावरचा एकही दागिना काढला नाही. ही बाब पोलिसांच्या नजरेत आली. त्यावरूनच प्रेमिलावरचा संशय गडद झाला. शेवटी पोलिसांनी तिच्या पतीसह प्रेमिलाला बेड्या ठोकल्या.

Web Title: Thieves with loyal love for a momentary moment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.