शेतकऱ्याच्या पीक कर्जाचे पैसे चोरट्याने पळविले

By Admin | Updated: May 9, 2015 00:11 IST2015-05-09T00:11:33+5:302015-05-09T00:11:33+5:30

जिल्हा बँकेतून काढलेली पीक कर्जाची रक्कम घेऊन पत्नीसह बाजारात जाणाऱ्या एका शेतकऱ्याची ९७ हजार ५०० रुपये ...

The thief threw away the farm loan credit for the farmers | शेतकऱ्याच्या पीक कर्जाचे पैसे चोरट्याने पळविले

शेतकऱ्याच्या पीक कर्जाचे पैसे चोरट्याने पळविले

दारव्हा येथील भरदुपारची घटना : ९७ हजार ५०० रुपये
दारव्हा : जिल्हा बँकेतून काढलेली पीक कर्जाची रक्कम घेऊन पत्नीसह बाजारात जाणाऱ्या एका शेतकऱ्याची ९७ हजार ५०० रुपये रोख असलेली पिशवी लंपास केली. ही घटना येथील जैन मंदिर परिसरात शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. पीक कर्जाचे पैसे लंपास झाल्याने शेतकऱ्यावर मोठे संकट कोसळले आहे.
मोतीराम बाबूजी हाके रा. घनापूर असे पैसे चोरीस गेलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. मोतीराम आपली पत्नी विमलाबाईसह शुक्रवारी दारव्हा येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेत आले. त्या ठिकाणी पीक कर्जाची रक्कम काढली. त्यानंतर पत्नी विमलबाईसह शहरातील एका कापड दुकानात गेले. तेथून परतत असताना पैशाची पिशवी पत्नीच्या हातात होती. जैन मंदिराजवळ दुचाकी (क्र.एम.एच.२९/५५८९) वरून दोन चोरट्यांनी पिशवी हिसकली. पळून जाण्याच्या प्रयत्नात दुचाकीवर त्यांचा तोल केला आणि दोघेही खाली पडले. मात्र क्षणात दुचाकी तेथेच सोडून चोरटे तेथून पसार झाले.
पैशाची पिशवी लंपास झालेल्या शेतकऱ्याने आरडाओरड केली. परंतु उपयोग झाला नाही. त्यानंतर मारोती हाके यांनी दुचाकी दारव्हा पोलीस ठाण्यात आणून जमा केली. तसेच या घटनेची माहिती ठाणेदार सदानंद मानकर यांना दिली. पोलिसांनी नाकाबंदी केली असून बँकेत जाऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये दोघे जण संशयास्पदरीत्या आढळल्याचे सांगण्यात आले. या दोघांना लवकरच जेरबंद करू असे पोलिसांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)

शेतकरी आणि संकट असेच समीकरण जिल्ह्यात काहीसे झाल्याचे दिसत आहे. निसर्ग तर शेतकऱ्यांच्या पाठीमागे लागलाच आहे. आता चोरटेही त्याला धड जगू देत नाही, असे दिसते. मोतीराम हाके या शेतकऱ्याचे तब्बल ९७ हजार ५०० रुपये चोरट्याने पळविल्याने त्यांच्यासमोर खरीप हंगामाचा प्रश्न उभा राहिला आहे. पैसेच नाही तर पेरणी कशी करावी, असा प्रश्न आहे.

Web Title: The thief threw away the farm loan credit for the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.