पुसदमध्ये रुग्ण तपासणीसाठी थर्मल गन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 05:00 IST2020-04-30T05:00:00+5:302020-04-30T05:00:23+5:30
तालुक्यात १८० गावे व १२० ग्रामपंचायती आहे. लोकसंख्या पाच लाखांच्या घरात आहे. ग्रामीण भागातील साडेतीन लाख जनतेसाठी सहा प्राथमिक आरोग्यकेंद्र असून या सर्व ठिकाणी ‘कोरोना व्हायरस फिवर क्लिनिक’ स्थापन करण्यात आले. शहरातील दीड लाख नागरिकांसाठी उपजिल्हा रूग्णालय व वसंतनगर आणि गढीवॉर्ड येथे ‘नागरी आरोग्य केंद्रात फिवर क्लिनिकची उभारणी केली आहे.

पुसदमध्ये रुग्ण तपासणीसाठी थर्मल गन
प्रकाश लामणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : तालुक्यात नऊ ठिकाणी ‘कोरोना फिवर क्लिनिक’ स्थापन करण्यात आले. आता तापाच्या रुग्णांच्या झटपट तपासणीकरिता अद्ययावत ‘थर्मल गन’ बोलाविण्यात आल्या. गेल्या २० दिवसांत या फिवर क्लिनिकमध्ये एकूण ३६० तापाचे रुग्ण आढळून आले असून त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरीच थांबण्यास सांगण्यात आले आहे.
तालुक्यात १८० गावे व १२० ग्रामपंचायती आहे. लोकसंख्या पाच लाखांच्या घरात आहे. ग्रामीण भागातील साडेतीन लाख जनतेसाठी सहा प्राथमिक आरोग्यकेंद्र असून या सर्व ठिकाणी ‘कोरोना व्हायरस फिवर क्लिनिक’ स्थापन करण्यात आले. शहरातील दीड लाख नागरिकांसाठी उपजिल्हा रूग्णालय व वसंतनगर आणि गढीवॉर्ड येथे ‘नागरी आरोग्य केंद्रात फिवर क्लिनिकची उभारणी केली आहे.
नऊ ‘फिवर क्लिनिक’मध्ये सर्दी, ताप, खोकला आदी आजारांची तपासणी ‘थर्मल गन’व्दारे करण्यात येत आहे. २८ एप्रिलपर्यंत ३६० तापाचे रुगण आढळले. २५ ते २८ एप्रिलपर्यंत उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. हरिभाऊ फुपाटे यांच्या मार्गदर्शनात ३२८ पैकी १० रुग्ण, जांबबाजार पीएचसीत डॉ. दीपक पोले यांच्या मार्गदर्शनात १५० पैकी १३ रुग्ण, चोंढीत डॉ. विशाल चव्हाण यांच्या मार्गदर्शनात २०२ पैकी तीन रुग्ण, फेट्रा पीएचसीत १०० पैकी ३ रुग्ण, बेलोरात डॉ. सूरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनात १६५ पैकी १० रुग्ण, शेंबाळपिंप्री येथे डॉ. अनिल भावसार यांच्या मार्गदर्शनात ९१ पैकी दोन रुग्ण, वसंतनगर येथे डॉ. विद्या राठोड यांच्या मार्गदर्शनात २७ पैकी दोन, तर गढीवॉर्ड येथे डॉ. रवि वावधने आणि डॉ. सारिका नाईक यांच्या मार्गदर्शनात ३८ पैकी २ रुग्ण अशा एकूण ११८९ रुग्णांची तपासणी केली.
यात एकूण ३६० तापाचे रुग्ण आढळले. त्या सर्वांना अॅन्टिबायोटिक औषधी देऊन उपचार करण्यात आले. त्यांना तूर्त घरीच थांबण्याचा सल्ला देण्यात आला. येथे ३१० बेडचे ‘डेडीकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर’ उभारण्यात आले असून आरोग्य यंत्रणा व तालुका प्रशासन सज्ज आहे.
तालुक्यात अद्याप कोरोना पॉझिटिव्ह नाही
कोरोनाचा भविष्यातील वाढता धोका लक्षात घेऊन तयारी करण्यात येत आहे. ‘फिवर क्लिनिक’मध्ये ‘थर्मल गन’ने तापाचे रुग्ण तपासण्यात येत असून त्यामुळे रुग्णाला हात न लावता तापमान कळते. डॉक्टरांच्या वेळेची बचत होते. तापाच्या रुग्णांना पाच दिवसांची औषधी देऊन तिसऱ्या दिवशी चौकशी केली जाते. तालुक्यात एकही कोरोना पॉझीटिव्ह नसून नागरिकांनी घाबरु नये व नियमांचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार प्रा. वैशाख वाहूरवाघ, डॉ. आशिष पवार यांनी केले आहे.