There will be a survey of cotton from farmers | शेतकऱ्यांकडील कापसाचे सर्वेक्षण होणार

शेतकऱ्यांकडील कापसाचे सर्वेक्षण होणार

ठळक मुद्देबाजार समितीमध्ये नोंदणी झालेल्यांची तपासणी, याद्या घेऊन फिरणार प्रतिनिधी

लोकमत न्यूज नेटवर्क
राळेगाव : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात कापूस विक्रीकरिता कृषी उत्पन्न बाजार समितीत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडे कापूस साठ्याचे शासकीय यंत्रणेकडून सर्वेक्षण केले जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीतील सूचनेनुसार हे सर्वेक्षण होणार आहे.
तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे आपला कापूस विक्रीसाठी नोंदणी केली आहे, अशा शेतकऱ्यांच्या घरी जावून अथवा ज्या ठिकाणी कापूस आहे त्याठिकाणी जावून नोंदणी केलेला कापूस उपलब्ध आहे काय, आदी बाबींचे सर्वेक्षण होणार आहे. बाजार समितीने नोंदविलेल्या यादीनुसार त्या-त्या गावात जावून कापसाचा साठा उपलब्ध असल्याचे सर्वेक्षण होईल.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रतिनिधी, गटसचिव किंवा सहायक निबंधक कार्यालयातील कर्मचारी सर्वेक्षण करतील. पंचनाम्यावर सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, कृषी सहायक यापैकी एकाची सही घेतली जाणार आहे. तसे निर्देश जिल्हा उपनिबंधकांनी तालुका सहायक निबंधकांना दिले आहे.
पंचनाम्यावर सहायक निबंधकांनी व्यक्तीश: एकत्रितपणे सदर सर्वेक्षणानुसार संबंधित शेतकऱ्याला आपला कापूस बाजार समिती अथवा जिनामध्ये नेण्याकरिता नियोजन करण्याचे सूचित करण्यात आले आहे. बाजार समितीमार्फत जिनिंगला वाहने पाठविण्याची व्यवस्था करण्याचे निर्देशित करण्यात आले आहे. या सर्वेक्षणामुळे तालुक्यात खळबळ माजली आहे. कापूस घरी शिल्लक नसतानाही नोंदी करून सीसीआयला विकू पाहणाऱ्या अनेकांचे धाबे दणाणले आहे.

कापूस घरात पडून
अनेक शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडून आहे. नोंदणी झालेली असतानाही खरेदी होत नसल्याने त्यांची चिंता वाढली आहे. दुसरीकडे आता बाजार समितीचे प्रतिनिधी तपासणी करणार असल्याने शेतकऱ्यांना स्वत:च्याच मालाविषयी उत्तरे द्यावी लागणार आहे. कापूस खरेदीची गती वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे, अशी अपेक्षा शेतकºयांना आहे.

नोंदणी झालेल्या याद्या निबंधकांकडे
बाजार समितीकडे नोंदणी झालेल्या याद्या सहायक निबंधकांनी त्यांच्या ताब्यात घेवून नियोजनाच्या प्रक्रियेस सुरुवात केली आहे. एकाच व्यक्तीचे नाव अनेकदा यादीमध्ये असल्यास छाननी करून एकच नाव ठेवण्यात यावे, इतर नोंदी रद्द कराव्या, असे आदेशात सुचविले आहे. यामुळे शेतकºयांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.

Web Title: There will be a survey of cotton from farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.