एकही नदी दुथडी भरून वाहिली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 23:27 IST2017-08-27T23:25:40+5:302017-08-27T23:27:37+5:30

दरवर्षी पावसाळ्यात पुराने हाहाकार उडविणाºया जिल्ह्यातील नद्या यंदा अर्धा पावसाळा संपूनही दुथडी भरुन वाहल्या नाहीत.

There was no river flooding | एकही नदी दुथडी भरून वाहिली नाही

एकही नदी दुथडी भरून वाहिली नाही

ठळक मुद्देअपुरा पाऊस : पर्जन्यमानाची टक्केवारी केवळ ४४, जलसंकट गंभीर होण्याची चिन्हे

ज्ञानेश्वर मुंदे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दरवर्षी पावसाळ्यात पुराने हाहाकार उडविणाºया जिल्ह्यातील नद्या यंदा अर्धा पावसाळा संपूनही दुथडी भरुन वाहल्या नाहीत. वर्धा, पैनगंगा, अरुणावती या मोठ्या नदीत तर जेमतेमच पाणी आहे. इतर नद्यांचे पात्र तर अद्याप कोरडेच आहे. वार्षिक सरासरीच्या केवळ ४४ टक्केच पाऊस झाल्याने ही कोरड्या दुष्काळाची चाहूल मानली जात आहे. आगामी काळात जिल्ह्यात पाणी संकट गडद होण्याची चिन्हे आहेत.
जिल्ह्यात वर्धा, पैनगंगा, अरुणावती, बेंबळा या मोठ्या नद्यांसह विदर्भा, गोखी, अडाण, पूस, शीप, खुणी, वाघाडी, चक्रवर्ती या बारमाही वाहणाºया नद्या आहेत. दरवर्षी या नदी तीरावरील गावांना पुराचा फटका बसतो. जुलै आणि आॅगस्ट महिन्यात हमखास पूर येऊन या नद्या शेतशिवार उद्ध्वस्त करतात. परंतु यंदा अर्धा पावसाळा संपला तरी नद्यांचे पात्र कोरडेच दिसत आहे. जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ४४.७६ टक्के पाऊस झाला. आतापर्यंत ४०७.९३ मिमी पावसाची नोंद झाली असून गतवर्षी २४ आॅगस्टपर्यंत ६९९.२४ मिमी पावसाची नोंद झाली होती. यंदा तुषार सिंचनासारखा पाऊस पडत असल्याने कोणत्याही नदीला पूर आला नाही. परिणामी नदी तीरावरील गावांमध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्ह्यातील वर्धा ही प्रमुख नदी असून बाभूळगाव, कळंब, राळेगाव, मारेगाव आणि वणी तालुक्यातून वाहते. पैनगंगा नदी पुसद, उमरखेड, महागाव, आर्णी, झरी आणि वणी तालुक्यातून वाहते. या दोनही नद्या यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरून वाहत वणी तालुक्यातील जुगाद येथे एकत्र येतात. या दोन नद्यांनी जिल्ह्याचा बहुतांश भाग सुपिक केला आहे. त्यासोबतच अनेक गावे रेड झोनमध्ये आणली आहे. परंतु यंदा या दोनही मोठ्या नद्या दुथडी भरुनही वाहल्या नाही. विदर्भा, अरुणावती, पूस, बेंबळा या नद्यांचीही अशीच अवस्था आहे.

रेती घाटांचा प्रश्न कायमच
यवतमाळ जिल्ह्यातून वाहणाºया नद्यांवर मोठ्या प्रमाणात रेती घाट आहे. शासनाला कोट्यवधींचा निधी मिळतो. मात्र यावर्षी या नद्यांना पूरच गेला नाही. त्यामुळे रेती वाहून आली नाही. तर दुसरीकडे नदी पात्र कोरडे असल्याने माफियांनी वारेमाप रेती उपसली. आगामी काळात रेती अभावी या घाटांची किंमत घटून जिल्ह्यात रेतीचा प्रश्न निर्माण होईल.

Web Title: There was no river flooding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.