पांढरकवडा येथे नादुरूस्त कार पेटली
By Admin | Updated: May 17, 2017 00:58 IST2017-05-17T00:58:43+5:302017-05-17T00:58:43+5:30
येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाजवळ असलेल्या एका सर्व्हिसिंग सेंटर व खासगी सेतू केंद्राच्या बाजुला अनेक

पांढरकवडा येथे नादुरूस्त कार पेटली
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा: येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाजवळ असलेल्या एका सर्व्हिसिंग सेंटर व खासगी सेतू केंद्राच्या बाजुला अनेक दिवसांपासून ठेऊन असलेल्या जुन्या व बंद स्थितीतील मारुती ८०० कारला अचानक आग लागून ही कार जळून खाक झाली. ही घटना मंगळवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली. लोहारा लाईनच्या बाजुला आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय परिसरात नगरपरिषदेचे गाळे असून या ठिकाणी एक वाहन दुरुस्तीचे दुकान तसेच आपले सरकार सेवा केंद्र हे इमरान अहमदखान यांचे खासगी सेतू केंद्र आहे. या सेतू केंद्रासमोरच एक फर्नीचर साहित्याचे दुकान व इतर अनेक दुकाने आहेत.
येथील अशपाक पोसवाल यांनी मागील वर्षी बंद स्थितीत असलेली जुनी मारोती ८०० कार विकत घेतली होती. तेव्हापासूनच बंद अवस्थेत असलेली ही कार आपले सरकार सेवा केंद्र या खाजगी सेतू केंद्राच्या समोरच ठेऊन होती. ही गाडी त्यांनी नुकतीच भंगारमध्ये विकायला काढली होती. मंगळवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास या गाडीचे दार कटरने कापन्याचे काम सुरु होते. कारच्या उजव्या बाजुचे समोरचे दार कटरने कापायला सुरुवात केली. हे दार कापून झाल्यावर मागचे दुसरे दार कटरने कापायला सुरुवात करताच, घर्षण होऊन ठिणग्या उडायला लागल्या.या ठिणग्यांमुळे गाडीच्या टायरने अचानक पेट घेतला. क्षणार्धात गाडीच्या इंजिननेही पेट घेतला. आसनांनीही पेट घेतला. आजुबाजूला असलेल्या लोकांना हे दृष्य दिसताच, त्यांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. मिळेल त्या साधनाने, त्यांनी पाणी आणून या जळत्या गाडीवर टाकले व आग विझविली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.