संघर्षाशिवाय पर्याय नाही
By Admin | Updated: December 6, 2014 22:56 IST2014-12-06T22:56:54+5:302014-12-06T22:56:54+5:30
त्याग आणि संघर्षाशिवाय उन्नती नाही, असा येथे आयोजित स्मृती पर्वातील परिसंवादाचा सूर होता. विविध वक्त्यांनी यावेळी आपले मत मांडले. यावेळी अध्यक्षस्थानी साहेबराव खडसे होते.

संघर्षाशिवाय पर्याय नाही
परिसंवाद : स्मृती पर्वात विविध विषयांवर मंथन
यवतमाळ : त्याग आणि संघर्षाशिवाय उन्नती नाही, असा येथे आयोजित स्मृती पर्वातील परिसंवादाचा सूर होता. विविध वक्त्यांनी यावेळी आपले मत मांडले. यावेळी अध्यक्षस्थानी साहेबराव खडसे होते.
विदर्भ तेली समाज महासंघ, गुरू रविदास विचार मंच, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समितीच्या संयोजनात परिसंवाद घेण्यात आला. महाराष्ट्रात तेली समाजाची संख्या २० टक्के आहे. परंतु या समाजाला ओबीसी प्रवर्गातील सवलती मिळतात. समाजाची आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिक स्थिती अतिशय दयनीय आहे. आरक्षणाचा टक्का वाढला तरच या समाजाची प्रगती शक्य आहे, असे सांगून महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक तथा सामाजिक विचार या समाजाने अंगिकारावे, असे मत विदर्भ तेली समाज महासंघाचे अध्यक्ष रमेश पिसे यांनी मांडले.
‘गुरू रविदासांचा वैज्ञानिक दृष्टिकोन’ या विषयावर आर.एम. चंदनकर, अमर तांडेकर, लोकेश मालखेडे यांनी विचार मांडले. ‘मातंग समाजाची शैक्षणिक अवस्था व फुले, आंबेडकर, अण्णाभाऊ साठेंची विचारधारा’ या विषयावर प्रा.बाळकृष्ण सरकटे, रामचंद्र भराळे, राजेश मानकर यांनी विचार मांडले.
या विषयावर बोलताना राजेश मानकर म्हणाले, आंबेडकरी आंदोलनात शहीद झालेल्यांमध्ये मातंग समाजाची संख्या अधिक आहे. त्यांची आर्थिकस्थिती दिवसागणिक खालावत चालली आहे. उस्ताद लहूजी साळवे, मुक्ता साळवे आणि अण्णाभाऊ साठेंचे हे अनुयायी जोपर्यंत बाबासाहेबांच्या विचारांची कास धरत नाही, तोपर्यंत त्यांना इतर समाजाच्या बरोबरीने येता येणार नाही. प्रगती केवळ आरक्षणाने शक्य नाही. त्यासाठी संघर्षाची गरज आहे, असे ते म्हणाले.
यावेळी मंचावर ज्ञानेश्वर रायमल, अजय समरित, संजय कांबळे, मनोज रणखांब, इंदूताई कांबळे, सुनीता काळे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)