दोन वर्षांपासून जिप्सम खताचा पुरवठा नाही
By Admin | Updated: August 1, 2016 00:49 IST2016-08-01T00:49:54+5:302016-08-01T00:49:54+5:30
नेर तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत जिप्सम खताचा पुरवठा केला जात होता.

दोन वर्षांपासून जिप्सम खताचा पुरवठा नाही
शेतकऱ्यांची ओरड : संततधार पावसाने सोनखास परिसरातील शेतजमिनी चिबडल्या
सोनखास : नेर तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत जिप्सम खताचा पुरवठा केला जात होता. परंतु तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी कृषी विभागात जिप्सम खताच्या पुरवठ्याबद्दल विचारपूस केली असता संबंधित कर्मचाऱ्यांनी शासनाकडून गेल्या दोन वर्षांपासून पुरवठाच झाला नसल्याचे सांगितले.
सतत सुरू असलेल्या पावसामुळे नेर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचा बराचसा भाग चिबडून गेला आहे. त्यामुळे तूर, कपाशी, सोयाबीन आणि अशा अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पानथळ जमिनीसाठी तालुका कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर जिप्सम खताचा पुरवठा केला जात होता. मात्र दोन वर्षांपासून कृषी विभागात जिप्सम खत उपलब्ध नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी जिप्सम खतापासून वंचित राहात आहेत. चिबडलेल्या शेतीसाठी जिप्सम खताची फार आवश्यकता निर्माण झाली आहे. सरासरी नेर तालुक्यातील सोनखास परिसरातील ५० टक्के क्षेत्र चिबडले आहे. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने जिप्सम खताचा पुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. (वार्ताहर)