पांढरकवडातील १३ गावात ग्रामपंचायत इमारत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:47 IST2021-08-14T04:47:39+5:302021-08-14T04:47:39+5:30

जिल्हा परिषदस्तरावरून डीपीडीसी, विकास योजना जनसुविधाअंतर्गत तसेच विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामपंचायत इमारतीसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. तरीही ...

There is no Gram Panchayat building in 13 villages of Pandharkavada | पांढरकवडातील १३ गावात ग्रामपंचायत इमारत नाही

पांढरकवडातील १३ गावात ग्रामपंचायत इमारत नाही

जिल्हा परिषदस्तरावरून डीपीडीसी, विकास योजना जनसुविधाअंतर्गत तसेच विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामपंचायत इमारतीसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. तरीही अशा योजनेतून पांढरकवडा तालुक्यातील १३ ग्रामपंचायती आतापर्यंत वंचित राहिल्या आहेत. यामध्ये वारा, कवठा, सिंगलदीप, वाई, कोपामांडवी, पिंपरी (बोरी), कोदोरी, वाघोली, घोंसी, कुंडी, मारेगाव (वन), मांगुर्डा, खैरगाव (बु.) या गावांचा समावेश आहे. येथे ग्रामपंचायत कार्यालयाची स्वतंत्र इमारत नसल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. गावाच्या विकासावरही याचा परिणाम झाला आहे. नवीन धोरणानुसार आता विकास निधी हा थेट ग्रामपंचायतीला मिळत असल्याने सरपंच पदासाठी अनेकांमध्ये स्पर्धा पाहायला मिळते. विकासाला चालना देणारे महत्त्वाचे ग्रामपंचायत कार्यालय स्वत:च्या हक्काच्या इमारतीत होणे आवश्यक आहे. ग्रामपंचायत कार्यालय हे विविध योजनांतून तसेच आमदार, खासदार निधीतून बांधता येते. मात्र, लोकप्रतिनिधींची इच्छाशक्ती नसल्याने १३ गावांतील ग्रामपंचायती कार्यालयाविना दिसत आहेत. गावपातळीवर अनेक ठिकाणी महिला सरपंच असल्याने त्यांचे पतीच कारभार हाकत असल्याचेही सांगितले जात आहे. राज्यातील अनेक ग्रामपंचायती आदर्श ग्रामपंचायत म्हणून पुढे आल्या आहेत. त्या स्वयंपूर्ण झाल्या आहेत. अनेक कल्याणकारी योजना त्यांनी राबविल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची सोय असो वा इतर कोणत्याही सुविधा असोत. त्या आपल्या नागरिकांना मोफत देत असतानासुद्धा दिसतात, असे इतर ठिकाणी चित्र असताना मात्र येथील ग्रामपंचायतींना स्वतःची हक्काची इमारत नसणे चिंतेची बाब आहे. अनेक ठिकाणी जागेची अडचण, तर अनेक ठिकाणी सचिव, सरपंच यांच्यात समन्वय दिसत नसल्याचेही बोलले जात आहे. यामुळेही अडचणी निर्माण होत आहेत. केंद्र व राज्य शासनाच्यावतीने अनेक डिजिटल योजना गावपातळीवर राबविण्यात येत आहेत. परंतु इमारत नसल्याने महत्त्वाच्या योजना राबविताना अनेक अडचणी येत आहेत.

कोट : माझ्या भेटीदरम्यान ग्रामपंचायत कार्यालयासाठी इमारत नसल्याचे निदर्शनास आले आहे. ग्रामपंचायतींना कार्यालयासाठी इमारती आवश्यक आहेत. त्यासाठी पंचायत समितीमार्फत पाठपुरावा करण्यात येत आहे. डॉ. भागवत रेजिवाड, सहाय्यक बीडीओ, पांढरकवडा.

Web Title: There is no Gram Panchayat building in 13 villages of Pandharkavada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.