वृक्ष लागवड योजनेचा हिशेबच नाही
By Admin | Updated: April 20, 2015 00:14 IST2015-04-20T00:14:51+5:302015-04-20T00:14:51+5:30
ग्रामपंचायत स्तरावर पर्यावरण संतुलित ग्रामसमृध्दीसह इतर योजनेतून विविध जातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.

वृक्ष लागवड योजनेचा हिशेबच नाही
गणना कागदावरच : कळंब तालुक्यात वृक्ष लागवडीवर कोट्यवधी रुपयांचा खर्च
कळंब : ग्रामपंचायत स्तरावर पर्यावरण संतुलित ग्रामसमृध्दीसह इतर योजनेतून विविध जातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतूनही गावागावात वृक्षारोपण करण्यात आले. सामाजिक वनिकरण आणि वनविभागही यात मागे नव्हता. परंतु आता लावलेली वृक्षच गायब झाल्याची ओरड होत आहे. मात्र किती वृक्ष लावण्यात आली आणि किती जिवंत आहेत, हे सांगायला कोणीही तयार नाही. वृक्ष लागवडीसाठी किती निधी वापरण्यात आला आणि प्रत्यक्ष किती वृक्ष जिवंत आहे, हे वृक्षगणनेनंतर उघड होते. परंतु त्यालाही हरताळ फासला गेला.
ग्रामपंचायत स्तरावर विविध योजनेतून लाखो वृक्षांची लागवड करण्यात आली. यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. मात्र जिवंत वृक्षांची संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे. राज्यातील तत्कालीन आघाडी सरकारने वृक्षगणना करण्याचे ठरविले आहे. परंतु ही गणना कागदावरच असल्याचे स्पष्ट होते.
जणगणना, पशुगणनेच्या धर्तीवर वृक्षगणना केली जाणार होती. ही जबाबदारी ग्रामसेवकाकडे सोपविण्यात आली. परंतु ती प्रामाणिकपणे पाळली गेली नाही. गावाच्या सर्वांगिण विकासासाठी शासनाने पर्यावरण विकासावर भर दिलेला आहे. यासाठी पर्यावरण संतुलित ग्रामसमृध्दी योजना, लोकसंख्येच्या प्रमाणात कर वसुली, प्लास्टिकमुक्त गाव, लोकसंख्येच्या ५० टक्के वृक्षारोपण, ७० टक्केच्यावर करवसुली, पाणीपट्टी वसुली, गोबरगॅस, घनकचरा व्यवस्थापन आदी निकष लावलेले आहे. यासाठी पंचायत समिती स्तरावरून ग्रामपंचायतीला थेट निधीचा वाटप केला जातो. परंतु वृक्षांचे अस्तित्वच दिसत नाही. कोणत्या विभागाने किती वृक्ष लावले आणि त्यातील किती जिवंत आहेत याची गणना व्हावी, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांमधून करण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)
वृक्षप्रेमींकडून पाठपुरावा
पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेण्यात आला. मात्र ज्यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली त्यांनी केवळ खड्डे खोदून ठेवले. परिणामी योजनेची वाट लागली. याप्रकरणी सखोल चौकशी व्हावी, या मागणीसाठी तालुक्यातील वृक्षप्रेमींनी पाठपुरावा सुरू केला आहे.