५० ग्रामपंचायतीत वीजपुरवठाच नाही
By Admin | Updated: January 25, 2015 23:29 IST2015-01-25T23:29:23+5:302015-01-25T23:29:23+5:30
एकीकडे शासन सर्व ग्रामपंचायतींना आॅनलाईन करीत असताना दुसरीकडे मात्र पुसद तालुक्यातील ५० हून अधिक ग्रामपंचायतींमध्ये अद्याप वीज जोडणी नसल्याचे धक्कादायक

५० ग्रामपंचायतीत वीजपुरवठाच नाही
पुसद : एकीकडे शासन सर्व ग्रामपंचायतींना आॅनलाईन करीत असताना दुसरीकडे मात्र पुसद तालुक्यातील ५० हून अधिक ग्रामपंचायतींमध्ये अद्याप वीज जोडणी नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यामुळे शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीला पुरविलेले संगणकही धूळ खात पडले आहे.
तालुक्यातील असंख्य ग्रामपंचायतींची अवस्था अतिशय वाईट आहे. अनेक ग्रामपंचायतींचा कारभार पारावरच होतो. तालुक्यातील ११९ ग्रामपंचायतींपैकी ८० ग्रामपंचायतींच्या स्वतंत्र इमारती असून ३९ ग्रामपंचायती गावातील शाळा अथवा इतर शासकीय इमारतीत कामकाज चालवितात. ग्रामपंचायतींमध्ये वीज नसल्यामुळे जिल्हा परिषदेने पुरविलेले संगणक सरपंच अथवा ग्रामसेवकांच्या घरी पडलेले आहेत. ग्रामपंचायतींच्या कारभारात सुसूत्रता यावी, नागरिकांची कामे जलदगतीने व्हावी या हेतूने सर्व ग्रामपंचायतींना संगणकाचे वितरण करण्यात आले आहे. याच सोबत सर्व ग्रामपंचायती आॅनलाईनने जोडण्यात आलेल्या आहेत. परंतु हे सर्व पुसद तालुक्यात तरी कागदोपत्रीच दिसत आहे. ५० पेक्षा अधिक ग्रामपंचायतींमध्ये वीज जोडणी नसल्यामुळे या ठिकाणचे संगणक कोठे गेले, हा प्रश्न आहे. वीज जोडणीसाठी आतापर्यंत कुणी व कसे प्रयत्न केले, हे मात्र गुलदस्त्यात आहे. सरपंच, सचिव व ग्रामसेवक नेमके काय करतात, हासुद्धा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. वीज जोडणीच नसल्याने संगणक सरपंच, ग्रामसेवकांच्या घरी राहणार, हे यातून स्पष्ट होते. संबंधित लोकप्रतिनिधींचेदखील याकडे लक्ष नाही. त्यामुळे आॅनलाईन योजनेला हरताळ फासला जात असून लाखो रुपये पाण्यात जात आहे.
(तालुका प्रतिनिधी)