साळ्याने जावयाला भोसकले
By Admin | Updated: August 7, 2015 02:27 IST2015-08-07T02:27:40+5:302015-08-07T02:27:40+5:30
शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या नायगाव (बु.) येथे बुधवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास साळ्याने जावयाला चाकूने भोसकले.

साळ्याने जावयाला भोसकले
गंभीर जखमी : नायगाव (बु.) येथील बुधवारी सायंकाळची घटना
वणी : शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या नायगाव (बु.) येथे बुधवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास साळ्याने जावयाला चाकूने भोसकले. यात जावई गंभीर जखमी झाला असून त्यांना चंद्रपूर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले.
तलाश महादेव त्रिशुले (३३) रा.नायगाव (बु.) असे आरोपीचे नाव आहे. तलाशने आपल्या आईला काही दिवसांपूर्वी घरातून हाकलून दिले होते. त्याची वृद्ध आई धोपटाळा (चंद्रपूर) येथील मंगला अमर सूर्यवंशी (३२) नामक मुलीकडे राहण्यासाठी गेली होती. गेल्या काही दिवसांपासून तलाशची आई मुलगी मंगलाकडेच राहत होती. दरम्यान मंगळवारी मंगला आईला घेऊन नायगाव (बु.) येथे पोहोचली. तेथे मंगलाने आईला एक किरायाची खोली करून दिली. त्यानंतर बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास वृद्ध आईसह मंगला आणि दुसऱ्या बहिणीचे यजमान सिद्धार्थ गुलाब खोब्रागडे (४४) रा.चंद्रपूर हे तिघे तलाशच्या घरी पोहोचले.
या तिघांनी तलाशला वृद्ध आईच्या साहित्याची मागणी केली. यावरून त्यांच्यात वाद झाला. या वादात सिद्धार्थ खोब्रागडे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र या वादाचे पर्यवसान हाणामारीत होऊन तलाशने जावई सिद्धार्थ खोब्रागडे यांच्यावर चाकूने वार केले. यात ते गंभीर जखमी झाले. शिरपूरचे ठाणेदार मनोज केदारे यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी पोलीस पथकासह तत्काळ घटनास्थळ गाठले. तेथे प्रथम जखमी सिद्धार्थला चंद्रपूर येथील रूग्णालयात रवाना करण्यात आले. त्यानंतर पहाटे ४ वाजतापर्यंत पोलीस पथकाने फरार झालेल्या तलाशचा शोध घेतला. गुरूवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास तलाशला अटक करण्यात पोलिसांना यश आले. या कारवाईत केदारे यांच्यासह योगेश ढाले, राऊत, बागेश्वर, कुळसंगे आदींनी सहभाग घेतला.
याप्रकरणी तलाशविरूद्ध भादंवि ३०७, ३२३ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. (कार्यालय प्रतिनिधी)