अजून मोठा पल्ला गाठयचाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 22:12 IST2018-02-11T22:11:13+5:302018-02-11T22:12:07+5:30
मोठे गायक होण्यासाठी अजून मोठा पल्ला गाठायचा आहे, असे मत लिटील चॅम्प अंजली गायकवाड हिने व्यक्त केले. बाबा कंबलपोष यात्रेनिमित्त आर्णीत आली असताना ती ‘लोकमत’शी बोलत होती.

अजून मोठा पल्ला गाठयचाय
हरिओम बघेल ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : मोठे गायक होण्यासाठी अजून मोठा पल्ला गाठायचा आहे, असे मत लिटील चॅम्प अंजली गायकवाड हिने व्यक्त केले. बाबा कंबलपोष यात्रेनिमित्त आर्णीत आली असताना ती ‘लोकमत’शी बोलत होती.
अंजली म्हणाली, मला भविष्यात मोठे गायक व्हायचे आहे. सुगम संगीताची आवड बालपणापासूनच असून वडील या क्षेत्रातील गाढे अभ्यासक असल्याने संगीताचे व गायनाचे बाळकडू मला बालपणी घरीच मिळाले. मी कधी लिटील चॅम्प होईल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. मात्र संगीत क्षेत्रातच करीअर करायचे असून खूप मेहनत घ्यावी लागणार असल्याचेही अंजलीने स्पष्ट केले.
संगीत क्षेत्रात मोठा टप्पा गाठायचा असून कोणत्याही क्षेत्रात काम करताना कठोर मेहनत व सातत्य हेच यशाचे गमक असल्याचे तिने सांगितले. ही शिकवण घरी बालपणापासून मिळाली असल्याने कोणत्याही क्षेत्रात मुलींनी स्वत:ला कमजोर समजू नये. ज्यात आवड आहे, तेच काम आपण केले पाहिजे. बालवाडीपासून आपल्याला वडिलांनी गायनाचे धडे दिल्याने अवघ्या तेराव्यावर्षी लिटील चॅम्प स्पर्धा जिंकता आली, असेही तिने सांगितले. यावेळी तिचे वडीलसुद्धा उपस्थित होते
महाराष्ट्रात घराघरात पोहोचल्यावर कसे वाटते, असे विचारल्यावर ती सहजतेने म्हणाली, अद्याप खूप मोठा टप्पा गाठायचा आहे. त्यासाठी सध्या रियाज सुरू आहे. सोबतच शिक्षणाकडेही लक्ष देत आहे.
सेमी इंग्रजीच्या सातव्या इयत्तेत शिकत असून शालेय मैत्रिणीनां वेळ देणे, टीव्ही बघणे, गप्पा मारणे, यात वेळ निघून जात असल्याचे तिने सांगितले. देशभर कार्यक्रम होत असल्याने शिक्षणाकडे बेरचदा दुर्लक्ष होते. अनेकदा आवडीच्या बाबींना मुरड घालावी लागते, असेही तिने नमूद केले.
मराठी लावणी, देशभक्तीपर गीते
सर्वधर्मीयांचे दैवत असलेल्या बाबा कंबलपोष यात्रेच्या कार्यक्रमासाठी ती आर्णीत आली होती. सिद्धार्थ खिल्लारे या कलाकारासोबत तिने शुक्रवारी रात्री गायनाचा कार्यक्रम सादर केला. प्रक्षकांनीही तिच्या गायनाला भरभरून दाद दिली. तिने मराठी लावणी, देशभक्तीपर हिंदी गीते सादर करून पेत्रकांची वाहवा मिळविली. सुमारे तीन तास तिने प्रेक्षकांना खिळवून ठेवले.