नगरपरिषदेसाठी साडे चार लाख मतदार
By Admin | Updated: October 20, 2016 01:36 IST2016-10-20T01:36:56+5:302016-10-20T01:36:56+5:30
नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात चार लाख ६९ हजार ८३१ मतदारांना मतदानाचा हक्क राहणार आहे.

नगरपरिषदेसाठी साडे चार लाख मतदार
६२२ केंद्र : महिलांची संख्या पुरूषांच्या बरोबरीने, आॅनलाईन उमेदवारी अर्जाची सोय
यवतमाळ : नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात चार लाख ६९ हजार ८३१ मतदारांना मतदानाचा हक्क राहणार आहे. यात पुरुषांच्या बबरोबरीने महिला मतदारांची संख्या आहे. मतदानासाठी ६२२ केंद्र राहणार असून दोन हजार ४८८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिंद्र पतापसिंग यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
जिल्ह्यात यवतमाळसह वणी, पुसद, दिग्रस, घाटंजी, आर्णी, दारव्हा आणि उमरखेड नगरपरिषदेची निवडणूक २७ नोव्हेंबरला होत आहे. जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली. या आठ ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. याशिवाय निवडणूक आयोगातर्फे तीन निरीक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. ६२२ केंद्राध्यक्षांसह दोन हजार ४८८ मतदान कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.
यवतमाळात २९४, पुसद६५, घाटंजी २७, उमरखेड ४८, वणी ७५, दिग्रस ४२, दारव्हा ३६, तर आर्णीत ३५ मतदान केंद्र राहणार आहे. मतदारांना ‘नोटा’चा पर्याय उपलब्ध राहणार आहे. निवडणूक विभागातर्फे मतदारांना छायाचित्रासह त्यांचा मतदार क्रमांक, परिसर असलेली स्लीप देण्यात येईल, अशी माहिती सचिंद्र प्रतापसिंग यांनी दिली.
यवतमाळात सर्वाधिक दोन लाख ३३ हजार ४0५ मतदार असून पुसद ५५ हजार ७६९, घाटंजी १५ हजार ५४३, उमरखेड ३६ हजार ९३९, वणी ४५ हजार ९२३, दिग्रस ३१ हजार ७८७, दारव्हा २७ हजार ७२, तर आर्णीत २३ हजार ३९३ मतदार आहेत. एकूण पुरूष मतदारांची संख्या दोन लाख ३८ हजार ८३0 असून महिला मतदारांची संख्या दोन लाख ३0 हजार ८२२ आहे. पुरूष मतदारांच्या तुलनेत महिलांची संख्या केवळ आठ हजारांनी कमी आहे. उमेदवारांना आॅनलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. त्यासाठी मदत केंद्र असेल.
२७ नोव्हेंबरला सकाळी ७.३0 ते सायंकाळी ५.३0 पर्यंत मतदान होईल, दुसऱ्या दिवशी २८ नोव्हेंबरला सकाळी १0 वाजतापासून मतमोजणी होईल. आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार प्राप्त होताच कारवाई केली जाईल, अशी ग्वाही सचिंद्र प्रतापसिंग यांनी दिली. पत्रपरिषदेला निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, महाजन, माहिती अधिकारी मंगेश वरकड, दिलीप कडासने आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)