यवतमाळ डेपोची बस वाटेतच पडली बंद, ५० प्रवासी उन्हात ताटकळले
By रवी दामोदर | Updated: May 13, 2023 14:31 IST2023-05-13T14:31:42+5:302023-05-13T14:31:51+5:30
राष्ट्रीय महामार्गावरील रिधोराजवळील घटना, यवतमाळ आगाराची बस क्रमांक (एमएच १४, बीटी ४९७८) ही प्रवाशांना घेऊन संभाजीनगरसाठी निघाली होती.

यवतमाळ डेपोची बस वाटेतच पडली बंद, ५० प्रवासी उन्हात ताटकळले
अकोला : जिल्ह्याचा पारा ४५ अंशाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला असून, दुपारच्या सुमारास जिवाची लाही लाही होत आहे. अशाच उन्हात यवतमाळहून संभाजीनगरसाठी निघालेली बस अचानक राष्ट्रीय महामार्गावरील रिधोरानजीक बंद पडली. पर्यायी बस लवकर न आल्याने ५० च्यावर प्रवाशांना तापत्या उन्हात ताटकळत बसावे लागल्याची घटना दि.१३ मे रोजी दुपारच्या सुमारास घडली.
यवतमाळ आगाराची बस क्रमांक (एमएच १४, बीटी ४९७८) ही प्रवाशांना घेऊन संभाजीनगरसाठी निघाली. अकोल्यात पोहोचताच क्लच प्लेटमधून धूर निघत असल्याचे बसचालकाच्या लक्षात आले. त्यानंतर लगेच बस बंद पडली. उन्हाच्या चटक्यांमुळे बसमधील प्रवासी त्रस्त झाले होते. चालक व वाहकांनी पर्यायी बसची व्यवस्था करीत प्रवाशांना मार्गस्थ केले. मात्र दुसरी बसही वेळेवर न आल्याने बसमधील काही प्रवाशांना तसेच उन्हात ताटकळत बसावे लागले. प्रवाशांमध्ये चिमुकल्यांचाही समावेश होता.
भंगार बस रस्त्यावर, फिटनेस सर्टीफिकेटवर प्रश्नचिन्ह
एसटी महामंडळाचा कारभार भोंगळ झाला असून, बहुतांश नादुरुस्त असलेल्या एसटी बस रस्त्यावर धावत असल्याचे दिसून येत आहे. कधी स्टेअरींग जाम, कधी क्लच प्लेटमध्ये अडचण, तर कधी चाक निखळण्याच्या घटना समोर येत आहेत. यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. बस नादुरूस्त असताना या बसेसना रस्त्यावर धावण्यासाठी फिटनेस सर्टीफिकेट देणाऱ्या उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या कर्तव्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. भंगार गाड्यांकडे अशाप्रकारे दुर्लक्ष करून प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रकार सध्या वाढत आहे.