796 एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2022 05:00 IST2022-01-31T05:00:00+5:302022-01-31T05:00:27+5:30

काम नाही तर दाम नाही, हे एसटी महामंडळाचे धोरण आहे. तरीही कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. आतापर्यंत कमी आणि अनियमित पगारामुळे वाईट दिवस काढावे लागले. लढा जिंकल्यास चांगले दिवस येतील, अशी आशा व विश्वास त्यांना आहे; परंतु दुसरीकडे या कर्मचाऱ्यांचे कुटुंब चिंतेत आहे. घरात वेळेवर किराणा येत नाही. महिना संपताच घरमालकाच्या किरायासाठी चकरा सुरू होतात. पाल्याची फी भरण्यासाठी शाळेतून वारंवार निरोप येतात. लवकरच देऊ, एवढेच या कुटुंबांचे उत्तर असते.

The families of 796 ST employees raised concerns | 796 एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली

796 एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कामावर नसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाने कठोर कारवाई केली. निलंबन, सेवासमाप्ती, बडतर्फी, बदली आदी प्रकारच्या कारवायांमुळे कर्मचाऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. तीन महिन्यांपासून हाती एक पैसाही आला नाही. सुरुवातीचा महिना कसातरी निघाला. मात्र, त्यापुढील दोन महिने या कर्मचाऱ्यांची परीक्षा पाहणारे ठरले आहे. यवतमाळ विभागातील ७९६ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची विवंचना वाढली आहे.
काम नाही तर दाम नाही, हे एसटी महामंडळाचे धोरण आहे. तरीही कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. आतापर्यंत कमी आणि अनियमित पगारामुळे वाईट दिवस काढावे लागले. लढा जिंकल्यास चांगले दिवस येतील, अशी आशा व विश्वास त्यांना आहे; परंतु दुसरीकडे या कर्मचाऱ्यांचे कुटुंब चिंतेत आहे. घरात वेळेवर किराणा येत नाही. महिना संपताच घरमालकाच्या किरायासाठी चकरा सुरू होतात. पाल्याची फी भरण्यासाठी शाळेतून वारंवार निरोप येतात. लवकरच देऊ, एवढेच या कुटुंबांचे उत्तर असते.
महिन्याचा खर्च साधारणपणे १२ ते १५ हजार रुपये आहे. किराणा, घरभाडे, दूध, भाजीपाला, पाल्याचे शिक्षण, भाजीपाला, पेट्रोलपाणी असा खर्च यातून भागवावा लागतो. आतापर्यंत उधार-उसणवार करून घरखर्च चालविला. आता मात्र या कर्मचाऱ्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची सहनशीलता संपत चालली आहे. 

३२३ कर्मचारी निलंबित
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ३२३ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. याशिवाय १०६ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती केली. २१३ कर्मचारी बडतर्फीच्या कारवाईत अडकले, तर १५४ कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. शिवाय, २६६ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आता चिंता वाटत आहे
घर किरायाचे आहे. उधार उसणवार करून उदरनिर्वाह चालविला जात आहे. घराचे भाडे, किराणा, याशिवाय इतर खर्च भागविणे कठीण झाले आहे. पैसा येण्याचे मार्ग बंद झाले, कसेतरी भागविणे सुरू आहे. आता चिंता वाटत आहे. घरात वृद्ध आईसह चार सदस्य आहे. पाल्याचे शिक्षण अडचणीत येण्याची भीती आहे. साधारण उपचार घेण्यासाठीही जवळ पैसा नाही. तडजोड करावी लागत आहे. कर्जावरील व्याज फुगत आहे. आर्थिक नुकसान होत आहे. पण पुढे चांगले दिवस येतील ही आशा आहे, अशा प्रतिक्रिया संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी नोंदविताना चिंताही व्यक्त केली आहे.

Web Title: The families of 796 ST employees raised concerns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.