ठाण्याच्या इमारतीचे सहा कोटी पडून
By Admin | Updated: July 14, 2016 02:36 IST2016-07-14T02:36:50+5:302016-07-14T02:36:50+5:30
शहराच्या विकासात भर घालणारी पोलीस वसाहत आणि पोलीस ठाण्याच्या इमारतीसाठी वर्षभरापूर्वी सहा कोटी रुपये मंजूर करण्यात आले.

ठाण्याच्या इमारतीचे सहा कोटी पडून
नेतृत्वाचा अभाव : जुन्याच इमारतीत कारभार
महागाव : शहराच्या विकासात भर घालणारी पोलीस वसाहत आणि पोलीस ठाण्याच्या इमारतीसाठी वर्षभरापूर्वी सहा कोटी रुपये मंजूर करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडेही वर्ग करण्यात आले. मात्र जागेची समस्या आणि विकासाचय दृष्टीचा अभाव यामुळे वर्षभरापासून हा निधी तसाच पडून आहे.
महागाव येथील पोलीस वसाहतीची मोठी समस्या आहे. पडक्या घरात पोलिसांना राहावे लागते. ही पडकी वसाहत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी दुरुस्तीच्या नावाखाली खर्चाचे कुरण बनले आहे. दुसरीकडे इंग्रजकालीन पोलीस ठाण्याची इमारतही खस्ताहाल झाली आहे. दोन वर्षांपूर्वी या इमारतीची वयोमर्यादा संपल्याचे पत्र प्राप्त झाले होते. परंतु या पत्राची दखलच घेण्यात आली नाही. या पोलीस ठाण्याचे छत पावसाळ्यात गळते. छताचे तुकडे खाली पडतात. यावर उपाय म्हणून नवीन वसाहत आणि ठाण्याच्या इमारतीचा पर्याय पुढे आला. पोलीस महासंचालकांनी जानेवारी २०१५ मध्ये पोलीस निवासस्थानासाठी पाच कोटी २५ लाख ६५ हजार रुपये आणि ठाण्याच्या इमारतीसाठी एक कोटी रुपयांचा धनादेश ८ जानेवारी २०१५ रोजी पुसद बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याच्या खात्यात वर्ग केला. इमारत बांधण्यासाठी पैशाची अडचण नाही. परंतु पोलीस वसाहत आणि ठाण्याची इमारत व्हावी, यासाठी कुणीही पाठपुरावा केला नाही. इमारतीसाठी लागणारी जागा नगरपंचायत उपलब्ध करून देणार आहे. त्याची एनओसी आणि दुसरी पर्यायी जागा घ्यायची असेल तर जिल्हा परिषद अध्यक्षांना भेटून जागा उपलब्ध करून घेणे एवढेच काम शिल्लक आहे. परंतु तेही करायला कुणी पुढे येत नाही. (शहर प्रतिनिधी)