‘ट्रॅप’च्या भीतीने ठाणेदार रजेवर

By Admin | Updated: November 23, 2014 23:26 IST2014-11-23T23:26:14+5:302014-11-23T23:26:14+5:30

पोलीस ठाण्याच्या कामकाजात व्यस्त असताना अचानक वरिष्ठाचा कॉल आला. लाचलुचपत विभागाचा सापळा असल्याची टीप मिळताच ठाणेदाराची पाचावर धारण बसली. टेबलवर कागद तसेच सोडून

Thanedar Raje's fear of 'Trap' | ‘ट्रॅप’च्या भीतीने ठाणेदार रजेवर

‘ट्रॅप’च्या भीतीने ठाणेदार रजेवर

कर्मचारी धास्तावले : वरिष्ठांचीच टीप
सतीश येटरे - यवतमाळ
पोलीस ठाण्याच्या कामकाजात व्यस्त असताना अचानक वरिष्ठाचा कॉल आला. लाचलुचपत विभागाचा सापळा असल्याची टीप मिळताच ठाणेदाराची पाचावर धारण बसली. टेबलवर कागद तसेच सोडून ठाणेदाराने खासगी वाहनाद्वारे धूम ठोकली. तेव्हापासून संबंधीत ठाणेदार आजारी रजेवर आहे. त्यामुळे ठाण्यात कार्यरत कर्मचारीही धास्तावल्याचे दिसत आहे.
पोलीस निरीक्षक झाल्यापासून तिनदा साईड ब्राँचला नियुक्ती झाली. यवतमाळ जिल्हा पोलीस दलात बदलीवर रूजू झाल्यानंतर संबंधित पोलीस निरीक्षकाला एका वादग्रस्त ठाण्यात नेमणूक देण्यात आली. तेथे दोन महिन्यांचा कालावधी पूर्ण होत नाही.
ठाणेदाराला टीप अन् पोलिसात खळबळ
वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या टीपवरून ठाणेदार चक्क आजारी रजा टाकून निघून गेले. आता या टीपवरूनच उलटसुलट चर्चा सुरू आहे. वरिष्ठाला मलिदा मिळत नसल्यानेच ही टीप दिली तर नसावी ना असाही सूर ऐकायला येत आहे.
असे असले तरी उपद्रवमूल्य अधिक असलेल्या एका ठाण्याचा कारभार सांभाळला जात नसल्याने संबंधित ठाणेदाराने तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांना बदलीसाठी गळ घातली. त्यांनी ही विनंती मान्य करीत उपद्रवमुल्य कमी असलेले ठाणे त्यांना बहाल केले. तेव्हापासून तेथेच असलेल्या संबंधित ठाणेदारांना अचानक वरिष्ठ अधिकाऱ्याचा फोन आला. यावेळी त्या वरिष्ठ अधिकाऱ्याने तत्काळ ठाण्यातून निघण्याचे फर्मान सोडून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक तुझ्यासह चालकावर सापळा रचून असल्याचे सांगितले. हे ऐकून पाचावर धारण बसलेल्या ठाणेदाराने तत्काळ ठाण्यातून खासगी वाहनाद्वारे धूम ठोकली.
गेल्या दहा दिवसांपासून मोबाईल बंद करून ते आजारी रजेवर असल्याचे सांगण्यात येते. संबंधित चालकही रजेवर गेला होता. मात्र अलीकडेच तो रूजू झाल्याचेही सांगण्यात येते. संबंधित ठाणेदार हा चालकाच्या माध्यमातून लाच घेणार होता किंवा खरेच लाचलुचपत विभागाचे पथक तेथे सापळा रचून होते, हा संशोधनाचा विषय आहे. लाचलुचपत विभागाची नजर आहे, असे कुठल्याही अधिकाऱ्याला कुणीही सांगावे आणि त्याने रजा टाकून पसार व्हावे अशी परिस्थिती आता निर्माण झाल्याचे या घटनेवरून दिसून येते. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Thanedar Raje's fear of 'Trap'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.