ठाणेदार नरेश रणधीर एक लाखांची लाच घेताना जाळ्यात; अमरावती पथकाची कारवाई
By सुरेंद्र राऊत | Updated: December 12, 2025 20:28 IST2025-12-12T20:26:15+5:302025-12-12T20:28:56+5:30
Nagpur : शहरातील अवधूतवाडी पाेलिस ठाण्यातील ठाणेदार नरेश रणधीर यांना एक लाखांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने शु्क्रवारी दुपारी रंगेहाथ पकडले.

Thanedar Naresh Randhir caught taking bribe of Rs 1 lakh; Amravati team takes action
यवतमाळ : शहरातील अवधूतवाडी पाेलिस ठाण्यातील ठाणेदार नरेश रणधीर यांना एक लाखांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने शु्क्रवारी दुपारी रंगेहाथ पकडले. ठाणेदारांच्या कक्षात सापळा यशस्वी झाला. लहान मुलाला कडेवरून घेऊन येत महिला अधिकाऱ्याने ही कारवाई यशस्वी केली. विशेष म्हणजे काही क्षणापूर्वीच उपविभागीय पाेलिस अधिकारी दिनेश बैसाने हे रणधीर यांच्या कक्षातून बाहेर पडले हाेते.
यवतमाळातील तक्रारदार १० डिसेंबर राेजी १० लाखांच्या आर्थिक व्यवहाराची तक्रार देण्यासाठी अवधूतवाडी पाेलिस ठाण्यात पाेहाेचले हाेते. त्यावेळी त्यांना ठाणेदार रणधीर यांनी पैसे परत मिळून देण्यासाठी ५ लाखांची मागणी केली. नंतर तडजाेडीत ३ लाख रुपयांत हा व्यवहार ठरला. तक्रारदाराने अमरावती एसीबीकडे संपूर्ण हकीकत सांगितली. एसीबीने तक्रारीची पडताळणी करून शुक्रवार, १२ डिसेंबर राेजी दुपारी अवधूतवाडी पाेलिस ठाण्यात सापळा लावला. यावेळी उपविभागीय पाेलिस अधिकारी दिनेश बैसाने रणधीर यांच्या कक्षात बसून हाेते. बैसाने बाहेर पडताच एसीबीचे पथक व तक्रारदार तेथे पाेहाेचला. एसीबी पथकातील महिला अधिकाऱ्याच्या समक्षच एक लाख रुपयांची लाच घेतली. वेशांतर करून आलेल्या पाेलिस निरीक्षक चित्रा मेसरे यांनी लगेच रणधीर यांना ताब्यात घेतले. पंचांसमक्ष कारवाई झाल्यानंतर पथकाने रणधीर यांना यवतमाळ एसीबी कार्यालयात आणले. तेथे अधिक चाैकशी सुरू हाेती. या प्रकरणात ठाणेदार रणधीर यांच्याविराेधात अवधूतवाडी पाेलिस ठाण्यातच लाच घेतल्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया एसीबीने सुरू केली. ही कारवाई अमरावती परिक्षेत्राचे पाेलिस अधीक्षक बापू बांगर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सचिंद्र शिंदे, पोलिस उपअधीक्षक सुनील किनगे यांच्या मार्गदर्शनात पाेलिस निरीक्षक चित्रा मेसरे, स्वप्नील निराळे, शिपाई शैलेश कडू, उपेंद्र थोरात, वैभव जायले, सतीश किटुकले, राजेश बहिरट यांनी केली.
२०१९ च्या घटनेला मिळाला उजाळा
जिल्हा पाेलिस दलाचे नाक असलेल्या एलसीबी प्रमुखाला २५ लाख रुपयांच्या लाच प्रकरणात जानेवारी २०१९ मध्ये रंगेहाथ अटक केली हाेती. त्यानंतर थेट पाेलिस निरीक्षक अडकण्याचा प्रकार अवधूतवाडी पाेलिस ठाण्यात घडला आहे. अवधूतवाडीमध्ये आर्थिक व्यवहार सांभाळण्यासाठी खासगी व्यक्ती नियुक्त केला हाेता. ही व्यक्ती नेहमीच चर्चेत हाेती. त्याच्या माध्यमातूनच सर्व व्यवहार चालत असल्याने सर्व सुरक्षित असल्याचा भास हाेता. अमरावती एसीबी पथकाने हे सुरक्षा कवच भेदून सापळा यशस्वी केल्याने अनेकांना हादरा बसला आहे.