ठाणेदार, मुख्याध्यापक लाचेत अडकले
By Admin | Updated: March 15, 2015 00:24 IST2015-03-15T00:24:40+5:302015-03-15T00:24:40+5:30
झरी तालुक्यातील पाटणचे ठाणेदार आणि एका पोलीस शिपायाविरुद्ध लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल तर थकीत रक्कम काढून देण्यासाठी सात हजार रुपयांची लाच...

ठाणेदार, मुख्याध्यापक लाचेत अडकले
पाटण/पुसद : झरी तालुक्यातील पाटणचे ठाणेदार आणि एका पोलीस शिपायाविरुद्ध लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल तर थकीत रक्कम काढून देण्यासाठी सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना पुसद येथील मुख्याध्यापक लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळ्यात अडकले. या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.
झरी तालुक्यातील पाटण पोलीस ठाण्याचे प्रमुख तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी भद्दू अहिरे आणि पोलिस शिपाई सुरेश निब्रड अशी गुन्हा दाखल झालेल्यांची आहे. पाटण पोलिसांनी काही दिवसांपूर्वी ट्रॅक्टर जप्त केला होता. हा ट्रॅक्टर सुपूर्दनाम्यावर सोडण्याची मागणी ट्रॅक्टर मालकाने केली होती. त्यासाठी न्यायालयात पोलिसांना से सादर करावा लागतो. हा से सादर करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती. १२ मार्च रोजी ही लाच स्वीकारण्याचे मान्य केले होते. या प्रकरणात पाटणच्या ठाणेदाराविरुद्ध त्याच्याच ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.
पुसद येथील युवा मंडळाद्वारा संचालित वसंतराव नाईक विद्यालयाचे मुख्याध्यापक राम बल्लाळ यांनी थकीत रक्कम काढून देण्यासाठी आपल्याच एका शिक्षक सहकाऱ्याकडून सात हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. मुख्याध्यापकांच्या अधिनस्थ कार्यरत सहाय्यक शिक्षकाला १६ महिन्यांच्या वेतनाची साडेतीन टक्के रक्कम व वाढीव डीएची ५० टक्के रक्कम काढून देण्यासाठी १४ हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती. सुरुवातीला सात हजार रुपये देण्याचे ठरले. इकडे या सहाय्यक शिक्षकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. पोलीस उपअधीक्षक सतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक नंदकुमार जामकर, नितीन लेव्हरकर यांच्या पथकाने शनिवारी पुसदमध्ये सापळा रचून मुख्याध्यापक बल्लाळ यांना अटक केली. मात्र साडेतीन टक्क्यांची ही रक्कम नेमकी कुणासाठी वसुली केली जात होती आणि ती दरमहा कुणाच्या तिजोरीत पडत होती, याचाही एसीबीने शोध घ्यावा, असा शैक्षणिक वर्तुळातील सूर आहे. (प्रतिनिधी)