उमरखेड तालुक्यात साथीच्या आजारांचे थैमान

By Admin | Updated: June 23, 2015 00:30 IST2015-06-23T00:30:09+5:302015-06-23T00:30:09+5:30

गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसानंतर आता उमरखेड तालुक्यात साथीच्या आजारांची लागण झाली आहे.

Thamen of pandemic diseases in Umarkhed taluka | उमरखेड तालुक्यात साथीच्या आजारांचे थैमान

उमरखेड तालुक्यात साथीच्या आजारांचे थैमान

औषधांचा तुटवडा : शेकडो रुग्णांची रुग्णालयात गर्दी
उमरखेड : गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसानंतर आता उमरखेड तालुक्यात साथीच्या आजारांची लागण झाली आहे. ग्रामीण भागात दररोज शेकडो रुग्ण रुग्णालयात येत आहे. परंतु वैद्यकीय केंद्रांमध्ये सोयी सुविधांचा अभाव असल्याने योग्य उपचार होताना दिसत नाही.
उमरखेड तालुका आरोग्य कार्यालयांतर्गत येणाऱ्या ढाणकी, मुळावा, सोनदाबी, विडूळ, कोरटा, थेरडी या सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ३३ उपकेंद्र असून यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल होत आहे. संडास, उलटी, ताप आदींची लागण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. परंतु आरोग्य कर्मचारी मुख्यालयी राहात नसल्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहे. यावर्षी मृग नक्षत्रात उमरखेड तालुक्यात चांगला पाऊस पडला. जमिनीत पाणी मुरले असून ते दूषित पाणी ग्रामीण भागातील नागरिक पिण्यासाठी वापरत आहे. या पाण्यावर शुद्धीकरणासाठी कोणतीही प्रक्रियेची सोय नाही. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत आहे.
ढाणकी, मुळावा, विडूळ, कोरटा, सोनदाबी, थेरडी या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये दररोज शेकडो रुग्ण दाखल होत आहे. उपकेंद्रांमध्येही रुग्ण वाढले आहे. यामध्ये खरूस, गाजेगाव, कृष्णापूर, ब्राह्मणगाव, चातारी, बोरी, पिंपळदरी, धनज, तरोडा, पोफाळी, पळशी, कुपटी, मोरचंडी, जेवली, बिटरगाव, आकोली, विडूळ, देवसरी, धानोरा, खरूस खु., मार्लेगाव, बाळदी, सुकळी, पार्डी, कोरडा, भवानी, कुरळी, खरबी, दराटी आदी उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या विविध गावांमध्ये डायरिया व उलटीची साथ दिसून येत आहे. विडूळ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या दिघडी येथे शेकडो रुग्णांना डायरियाची लागण झाल्याची माहिती आहे. त्या ठिकाणी आरोग्य विभागाचे कर्मचारी तळ ठोकूर आहे.
उमरखेड शासकीय रुग्णालयातही रुग्णांची संख्या वाढली आहे. या रुग्णालयात सध्या सुनीता कदम, सोमा राठोड, शारदाबाई चव्हाण, सरस्वती चव्हाण, सुरेश लोमटे, अनुराधा राणे, वंदना घोंगडे, ललिता कानिंदे, फरहा शेख, राशद पठाण, रेखा कळसे, लक्ष्मण राणे आदी विविध गावातील रुग्ण दाखल झाले आहे. संडास, उलटी, डायरिया आदी आजारांसाठी लागणाऱ्या औषधींचा तुटवडा जाणवत आहे. ओआरएस पावडर अनेक रुग्णालयांमध्ये नाही. तसेच रात्रीच्या सुमारास कर्मचारीच उपस्थित राहात नसल्यामुळे रुग्णांवर योग्य उपचार होत नाही. अनेक रुग्ण नाईलाजास्तव खासगी रुग्णालयात उपचारार्थ जात आहे.
ग्रामीण भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे साथीच्या रोगाची लागण झाली आहे. नागरिकांनी या बाबत काळजी घेणे गरजेचे आहे. तालुक्यात साथीच्या आजारांची लागण झाली असली तरी सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यासह आमदार व इतर कुठल्याही लोकप्रतिनिधीचे याकडे लक्ष नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)

तालुक्यातील सर्व आरोग्य केंद्रांमध्ये पुरेसा औषधी साठा आहे. रुग्णांची योग्य व्यवस्था होत आहे. मुख्यालयी उपस्थित न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. नागरिकांना कोणताही त्रास असल्यास त्यांनी तालुका आरोग्य कार्यालयाकडे लेखी तक्रार करावी.
- डॉ.जब्बार पठाण
तालुका वैद्यकीय अधिकारी, उमरखेड

Web Title: Thamen of pandemic diseases in Umarkhed taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.