शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थाळीनाद
By Admin | Updated: October 29, 2015 02:55 IST2015-10-29T02:55:34+5:302015-10-29T02:55:34+5:30
तालुक्यातील पिकाची पैसेवारी ४० टक्क्याच्या आत घोषित करून शेतकऱ्यांना पीक विम्यासह शासकीय सोयी देण्यात याव्या,

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थाळीनाद
दुष्काळ जाहीर करा : शासनाच्या धोरणाचा निषेध, संपूर्ण कर्जमाफीची मागणी
उमरखेड : तालुक्यातील पिकाची पैसेवारी ४० टक्क्याच्या आत घोषित करून शेतकऱ्यांना पीक विम्यासह शासकीय सोयी देण्यात याव्या, या मागणीसोबतच वीज वितरणचा अनागोंदी कारभाराचा निषेध करून जिल्ह्यात महागाई व दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी बुधवारी थाळीनाद आंदोलन केले.
यावर्षी तालुक्यातील खरीप हंगाम पूर्णत: उद्ध्वस्त झाल्यानंतर शेतकऱ्यांवर आभाळ कोसळले आहे. अशा परिस्थितीत वीज विभागाकडून भारनियमन सुरूच आहे. त्यामुळे उरले सुरले पीकही वाचविण्यासाठी शेतकऱ्यांकडे वीज नाही. वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. या ज्वलंत प्रश्नांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी उपविभागीय कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन केले. शासन व प्रशासनाविरुद्ध घोषणा देऊन व्यवस्थेविषयी प्रचंड रोष व्यक्त केला.
यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व वीज अभियंत्याला देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे मोहनराव मोरे, भीमराव पाटील चंद्रवंशी, जिल्हा उपाध्यक्ष बालाजी वानखडे, उत्तमराव राठोड यांनी निवेदन देवून अधिकाऱ्यांसोबत शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत चर्चा केली. तसेच त्या त्वरित सोडविण्यात याव्या, अशी मागणी केली.
सोयाबीन या महत्त्वाच्या पिकाने यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे दगा दिला. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. यातूनच शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबताना दिसत नाही. याला शासनाचे असंवेदनशील धोरणच कारणीभूत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. सोयाबीन पिकाची पैसेवारी ४० टक्क्याच्या आत घोषित करावी, वीज वितरण कंपनीच्या लहरीपणाचा फटका बसत असल्याने विजेचा नियमित पुरवठा करण्यात यावा, पैनगंगा नदीवर साखळी बंधारे बांधण्यात यावे, दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे उमरखेड तालुक्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांचे कर्ज पूर्णपणे माफ करण्यात यावे, अशा विविध मागण्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी केल्या. यावेळी प्रा.मोहनराव मोरे, माजी नगराध्यक्ष राजूभैय्या जयस्वाल, कल्याणराव माने, शेख इसाराज, उत्तम जाधव, नगरसेवक साजीद जागिरदार, बळवंतराव चव्हाण, सिद्धेश्वर जगताप, प्रदीप पाटील देवसरकर, संजय शिंदे, अमर राठोड, डॉ.रवी चव्हाण, पांडुरंग खापरे, तुळशीराम चव्हाण, सूर्यकांत पंडित आदींसह तालुक्यातील शेतकरीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
(शहर प्रतिनिधी)