जिल्ह्यात लवकरच टेक्सटाईल पार्क
By Admin | Updated: May 2, 2015 01:57 IST2015-05-02T01:57:39+5:302015-05-02T01:57:39+5:30
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कापसाचे वितरण करण्यात येते. राज्य शासनाने विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी...

जिल्ह्यात लवकरच टेक्सटाईल पार्क
यवतमाळ : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कापसाचे वितरण करण्यात येते. राज्य शासनाने विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी येथे प्रक्रीया उद्योग उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विदर्भात येत्या काही दिवसांमध्ये चार टेक्सटाईल पार्क उभे राहात असून त्यात यवतमाळचाही समावेश असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी पोस्टल मैदानावर अयोजित महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात सांगितले.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५५ व्या वर्धापनदिनाचा मुख्य सोहळा येथील पोस्टल मैदानावर आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी शुभेच्छा देतांना ते बोलत होते. कार्यक्रमास यवतमाळचे नगराध्यक्ष सुभाष राय, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, अप्पर पोलिस अधिक्षक जे.बी.डाखोरे यांच्यासह अधिकारी, माजी
सैनिक, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले, गेल्या पाच महिन्यात प्रशासन अधिक लोकाभिमूख करण्यासाठी शासनाने विविध उपक्रम हाती घेतले. नागरिकांची कामे जलदगतीने व ठराविक कालावधीत व्हावी यासाठी सेवा हक्क कायदा लागू केला. महाराष्ट्र टंचाईमुक्त करण्यासाठी शासनाने महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियान सुरू केले. या अभियानांतर्गत जिल्ह्यासाठी ३९६ कोटी रूपयांचा आराखडा तयार करण्यात आला. १२ हजार ७१६ जलसंधारणाची कामे यातून होणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात ५०३ गावांची निवड करण्यात आली आहे. टप्प्या टप्प्याने टंचाई परिस्थिती असलेली सर्वच गावे या अभियानाने जोडली जाणार आहे.
महसूल राज्यमंत्री म्हणून काम करताना जिल्ह्यात तालुकास्तरावरील प्रशासकीय इमारती, तलाठी कार्यालय, तालुक्याच्या ठिकाणी पोलिस पाटील भवन, दर्जा नसलेल्या गावांना महसूली दर्जा, शेतकऱ्यांच्या जमिनींचे तुकडी बंदी आदी विषय प्राधान्याने हातात घेतल्याचे राठोड यांनी सांगितले.
रोजगार हमी योजना व धडक सिंचन योजनेतून विहीरींची कामे करत असताना खचलेल्या आणि बुजलेल्या विहीरींनाही दुरूस्तीचा लाभ देण्याचा आग्रह धरला होता. शासनाने काही दिवसांपूर्वी त्यासंदर्भातला आदेश काढला. शेतकऱांना केवळ विहीरी देऊन उपयोग नाही. विहिरीवर सिंचनासाठी पंप आणि त्याला वीज जोडणी नसेल तर उपयोग होणार नाही. त्यासाठी शासनाने विशेष बाब म्हणून ५७ कोटी रूपयाचा निधी जिल्ह्याला नुकताच मंजूर केला. जुन्या प्रलंबित ९ हजार शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देण्याची कार्यवाही जिल्ह्यात वेगाने सुरू आहे.
धामणगाव देव आपल्या जिल्ह्याचे तीर्थक्षेत्र आहे. पोहरादेवी बंजारा समाजाची काशी आहे. धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्वाच्या या स्थळांचा विकास करण्यासाठी शासनाने दोन्ही स्थळांसाठी पहिल्या टप्प्यात प्रत्येकी ६ कोटींची तरतूद केली आहे. गावगाड्यातील नागरीकांच्या अजूनही अनेक समस्या आहे. त्या समजून घेणे आवश्यक आहे. त्यासाठीच या महिन्यापासून समाधान शिबिराच्या माध्यमातून तालुकास्तरावर जनता दरबार घेण्यात येणार आहे.
उद्योगांसाठी अकृषक परवानगी सुधारणा विधेयक नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशात मांडण्यात आले. या विधेयकामुळे पूर्वी ज्या कामसाठी मोठा कालावधी लागायचा ते काम केवळ १५ दिवस ते एक महिन्यात पूर्ण होणार आहे. यामुळे राज्यात उद्योगांना चालना मिळणार असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी याप्रसंगी सांगितले. ध्वजारोहणानंतर पोलिस दलाच्यावतीने पालकमंत्र्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी उत्कृष्ट काम करणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांचा पालकमंत्र्यांच्याहस्ते गौरव करण्यात आला. (कार्यालय प्रतिनिधी)